सांगलीत विद्यार्थ्यावर मित्राचा कोयत्याने हल्ला | पुढारी

सांगलीत विद्यार्थ्यावर मित्राचा कोयत्याने हल्ला

सांगली, पुढारी वृत्तसेवा : शहरातील हरभट रस्त्यावरील एका शाळेत विद्यार्थ्यावर वर्गमित्रानेच कोयत्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्यात अल्पवयीन विद्यार्थी गंभीर जखमी झाला. किरकोळ कारणातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आलेे.

या घटनेमुळे शाळेत खळबळ उडाली. अल्पवयीन हल्लेखोर विद्यार्थ्याने दप्तरातून कोयता आणला होता. पूर्वीच्या वादातूनच हे कृत्य घडल्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

घटनास्थळी आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जखमी विद्यार्थी हा कुटुंबासह शंभरफुटी रस्ता परिसरात राहतो. सोमवारी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. संशयित हल्लेखोर त्याचा वर्गमित्र आहे. त्यांच्यात किरकोळ कारणातून अनेकवेळा वाद झालेला आहे. दोन दिवसांपूर्वीही त्यांच्यात वाद झाला होता. त्याचे पर्यवसान हल्ला होण्यात झाले. संशयिताने शाळेत येताना दप्तरातूनच छोटा कोयता आणलेला. त्याने विद्यार्थ्यावर थेट हल्ला केला. त्याच्या मानेवर आणि हातावर वर्मी घाव बसल्याने तो जखमी झाला.

शाळेतील शिक्षकांनी जखमीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शस्त्रक्रिया करावी लागल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

Back to top button