शरद पवार आज सांगली जिल्ह्याच्या दौर्‍यावर, काय बोलणार? नेते, कार्यकर्त्यांचे लक्ष | पुढारी

शरद पवार आज सांगली जिल्ह्याच्या दौर्‍यावर, काय बोलणार? नेते, कार्यकर्त्यांचे लक्ष

सांगली; पुढारी वृत्तसेवा : राष्टवादी काँगेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार आज सांगली जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. येथील राजारामबापू पाटील यांचा पुतळा अनावरणासह विविध कार्यक्रम होणार आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पवार पहिल्यांदाच जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. काही दिवसांपासून त्यांच्या गटाला मोठी गळती लागली असून या दौर्‍यामुळे ती थांबणार का? ते काय बोलणार? याकडे सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते यांचे लक्ष आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जिल्ह्यात शरद पवार गट व अजित पवार गट यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. अजित पवार गटातून शहर जिल्हाध्यक्ष म्हणून प्रा. पद्माकर जगदाळे व ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून वैभव पाटील यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी बैठकांचा सपाटा सुरू केला आहे. विविध पक्षांतून कार्यकर्त्यांना ते घेत आहेत. दुसर्‍या बाजूला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनीही शहर व ग्रामीण पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन, निवडणूक तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. पाच फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा दौर्‍यावर येणार आहेत. जिल्ह्यात त्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या उद्घाटनासह विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यांच्या अगोदर शरद पवार येत आहेत.

शरद पवार यांना जिल्ह्यातून पहिल्यापासूनच चांगलेच पाठबळ मिळाले. सुरुवातीच्या काळात राजारामबापू यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्ते त्यांच्याबरोबर होते. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर दिवंगत नेते विष्णुअण्णा पाटील, आर. आर. पाटील, त्याशिवाय जयंत पाटील हे पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीतून आर. आर. पाटील, जयंत पाटील यांना राज्यपातळीवर नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात पक्षाचा विस्तार झाला. आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमन पाटील, आमदार अरुण लाड यांची ताकद राष्ट्रवादीमागे आहे. महापालिका, जिल्हा बँक, जिल्हा परिषद यांसह विविध संस्था ताब्यात आल्या. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर जयंत पाटील राष्ट्रवादी पक्ष सांभाळत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातून बाहेर पडत स्वतंत्र गट तयार केल्यानंतर जिल्ह्यातही फूट पडली. पहिल्या टप्प्यात विट्याचे वैभव पाटील, सांगलीतून पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी अजित पवार गटात गेले. त्यानंतर गेल्या आठवड्यात महापालिका क्षेत्रातील काही माजी नगरसेवकांनीही अजित पवार यांची भेट घेतली. महापालिका क्षेत्रातील 14 माजी नगरसेवक लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार, अशी चर्चा आहे.

Back to top button