सांगली : सावळजमध्ये विरोधी गटाच्या सदस्यांची मनमानी; सरपंच – उपसरपंचांसह सदस्यांची तक्रार | पुढारी

सांगली : सावळजमध्ये विरोधी गटाच्या सदस्यांची मनमानी; सरपंच - उपसरपंचांसह सदस्यांची तक्रार

तासगाव : पुढारी वृत्तसेवा : सावळज (ता तासगाव) येथील आशा स्वयंसेविका नियुक्तीच्या मुद्यावरुन सदस्य ऋषिकेश बापुसो बिरणे व योगेश दादासो पाटील यांनी ग्रामसेवकांना शिवीगाळ करत हाकलून बाहेर काढले. विरोधी गटांच्या या दोन सदस्यांच्या सततच्या राजकीय दबावाने गावातील विकास कामे खोळंबली आहेत. तर सदस्यांच्या भितीमुळे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतीमध्ये येत नाहीत.

संबंधित बातम्या 

सदस्यांच्या मनमानी कारभाराची आपण सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. त्यांचे सदस्यपद रद्द करावे आणि ग्रामविकास अधिकारी यांना तात्काळ रुजू होण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी सरपंच मिनल संदीप पाटील, उपसरपंच रमेश आनंदा कांबळे यांच्यासह १४ सदस्यांनी निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचेकडे केली आहे.

या निवेदनात म्हटलं आहे की, विरोधकांच्या राजकीय दबावामुळे ग्रामविकास अधिकारी गेल्या काही दिवसापासून ग्रामपंचायतीमध्ये आलेले नाहीत. काही दिवसापूर्वी झालेल्या एका मासिक मीटिंगमध्ये विरोधी सदस्यांनी ग्रामसेवकांना ग्रामपंचायतीमधून हाकलून काढले होते. सरपंच मीनल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतची मासिक मिटिंग सुरु असतानाच विरोधी सदस्यांनी या मीटिंगमधून ग्रामसेवकास अक्षरक्ष: हाकलून बाहेर काढले. त्यामुळे आम्हाला ग्रामविकास अधिकारी यांच्या गैरहजेरीत मासिक मीटिंग घेण्याची वेळ आली. घटनेपासून आज अखेर ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतीकडे फिरकले नाहीत.

ज्या- त्या अशा स्वयंसेविकांची नियुक्ती आम्ही शासनाच्या आदेशानुसार केली आहे, निवड प्रक्रिया पारदर्शी झाली आहे. याबाबत विरोधी सदस्यांनी चौकशीसाठी एक तक्रार देखील केली आहे. या चौकशीबाबत आमची कोणतीही हरकत नाही. तरीदेखील कायदा हातात घेऊन दहशतीने आणि दडपशाहीने ग्रामसेवकावर दबाव टाकून ग्रामपंचायतीच्या कामात अडथळा निर्माण करण्याचे काम सुरु आहे. राजकीय सूडबुद्धीतूनच विरोधक ग्रामपंचायतीच्या कामकाजात विरोध करत आहेत.

निवेदनावर सरपंच मिनल संदीप पाटील, उपसरपंच रमेश आनंदा कांबळे यांच्यासह अविनाश प्रकाश म्हेत्रे, सुवर्णा रावसो पाटील, शोभा सुधाकर सुतार, सुवर्णा विश्वजीत थोरात, विनोद भिमराव कोळी, कल्पना नामदेव बुधवले, अनिता राजाराम भडके, संजय जगन्नाथ थोरात, कल्पना रविंद्र धेंडे, सुमन तानाजी चव्हाण, सोमनाथ मधुकर कांबळे आणि संजय महादेव बुधवले या ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या केल्या आहेत.

Back to top button