Ahamadnagar : नेवासा दुर्गादेवी मंदिरातील दानपत्र पळविले

Ahamadnagar : नेवासा दुर्गादेवी मंदिरातील दानपत्र पळविले

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : नेवासा शहरात भरवस्तीत असलेल्या दुर्गादेवी मंदिरातील दान पात्र अज्ञात चोरट्यांनी पळविले. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नवीन पोलिस निरीक्षकांचे चोरट्यांनी मंदिराची दानपेटी चोरून स्वागत केले आहे.

याबाबत मंदिर पुजारी सुभाष चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नेहमीप्रमाणे पहाटे 5.30 च्या सुमारास मंदिराची झाडलोट करण्यासाठी आलो असता, मंदिरातील दानपात्र चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या भागाची पाहणी केली. नेवासा पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास दोन ते तीन अज्ञात इसम सदरचे दान पात्र खांद्यावर घेऊन जात असताना निदर्शनास आले. याबाबत पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास नव्यानेच आलेले पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या अगोदर देखील दुर्गादेवी मंदिरातील दान पात्र 5 एप्रिल 2019 रोजी फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला होता. तो प्रयत्न रात्री 12.30 सुमारास झाला होता. मात्र, त्यावेळी बाहेर बसलेल्या युवकांनी सतर्कता दाखविल्याने चोरट्यांनी मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या गोदामावर चढून पोबारा केला होता. त्यामुळे दान पात्र फोडण्याचा प्रयत्न फसला होता. कालांतराने नेवासा शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. मात्र, त्यातून मंदिरासारखे मुख्य ठिकाणे वगळले गेले. येथे जवळच असलेल्या तलाठी कार्यालयासमोरून नितीन धस यांची मोटारसायकल चोरीस गेली.

त्याचा ही तपास लागलेलानाही. मागील आठवड्यात संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या जवळ असलेल्या देशमुख यांच्या घरावर देखील घरात घुसून अज्ञात चोरांकडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला. नेवासा शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. मात्र, अनेकवेळा मागणी करू ही मंदिराच्या ठिकाणी व गल्लीबोळात अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे न बसविल्याने नेवासा शहर अजूनही असुरक्षित असल्याची भावना नागरिकांमधून बोलली जात आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू करावी. तसेच, गल्लीबोळात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, दान पात्र चोरणार्‍या अज्ञात चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी येथील तरूण मंडळे व हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.

नेवासा पोलिस ठाण्यात राहुरी येथून नव्यानेच दाखल झालेले पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यापुढे या चोरट्यांचे मोठे आव्हान आहे. याबाबत नेवासा शहराच्या सुरक्षिततेबाबत ते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
भाविकांकडून तीव्र संताप व्यक्त केला . या आधीही नेवासा शहरातील एसटी स्टॅण्डजवळील मळगंगा देवी मंदिर, मारूती चौकातील हनुमान मंदिर येथे दान पात्र फोडून रक्कम चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. दुर्गादेवी मंदिरातील ही दुसरी घटना असून, भाविकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हिंदुत्ववादी संघटना मोर्चा काढणार

शहरातील विविध मंदिरातील दानपेट्या फोडून झालेल्या चोर्‍यांचा अद्यापही तपास लागलेला नाही. त्यामुळे शहरात दुर्लक्षित भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. चोर्‍यांचा तपास लावावा, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना व सकल हिंदू समाजाने मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news