राज्यात ‘आरटीई’तील 19 हजार जागा रिक्तच | पुढारी

राज्यात ‘आरटीई’तील 19 हजार जागा रिक्तच

संजय खंबाळे

सांगली :  शिक्षक हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) देण्यात येणार्‍या प्रवेशासाठी राज्यात 1 लाख 34 हजार 385 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यातील 82 हजार 793 जणांनी प्रवेश घेतला आहे. अद्यापही 19 हजार 54 जागा रिक्तच आहे. प्रवेशासाठी असणारी प्रतीक्षा यादीची मुदत संपली आहे. त्यामुळे आता आरटीईतून प्रवेशासाठी पुढील वर्षाची वाट पाहावी लागणार आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू होती. सुरुवातीला आरटीईतून प्रवेशासाठी निवड यादी निश्चित करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी चारवेळा प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र त्यानंतरही 19 हजार 54 जणांनी प्रवेश घेतलेला नाही. पसंतीच्या शाळेत प्रवेश न मिळाल्यामुळे जागा रिक्त राहिल्याची माहिती देण्यात आली. प्रवेश घेण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे यावर्षी राज्यात 18.71 टक्के जागा रिक्तच राहिल्या आहेत.

आरटीईअंतर्गत राज्यात 8 हजार 824 कॉलेजीसमध्ये 1 लाख 1 हजार 847 प्रवेशक्षमता आहे. या प्रवेशासाठी 3 लाख 64 हजार 413 जणांनी अर्ज केला होता. त्यातून 1 लाख 34 हजार 385 जणांची प्रवेशासाठी निवड झाली होती. मात्र 81.29 टक्के म्हणजेच 82 हजार 793 जणांनी प्रवेश घेतला आहे.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज अन् प्रवेशही

यंदा पुणे जिल्ह्यातून आरटीईसाठी सर्वाधिक 77 हजार 531 जणांनी प्रवेशासाठी अर्ज केला होता. त्यातील 22 हजार 523 जणांची निवड झाली. मात्र त्यातील 14 हजार 120 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. ही प्रवेशसंख्या राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

जिल्हानिहाय क्षमता, प्रवेश घेतलेली संख्या…

जिल्ह्याचे नाव, प्रवेश क्षमता आणि प्रवेश घेतलेली विद्यार्थीसंख्या अशी ः अहमदनगर : 2825, 2486, अकोला : 1946, 1749, अमरावती 2305, 2076, छत्रपती संभाजीनगर : 4062, 3451, भंडारा : 763, 710, बीड : 1827, 1633, बुलडाणा : 2246, 2054, चंद्रपूर : 1504, 1298 , धुळे : 1006, 959, गडचिरोली : 465, 366, गोंदिया : 864, 814, हिंगोली 539, 471, जळगाव : 3081, 2627, जालना : 2273, 1988, कोल्हापूर : 3270, 2301, लातूर : 1669, 1427, मुंबई : 6569, 4505, नागपूर : 6577, 5721, नांदेड :2251, 2068, नंदुरबार : 340, 264, नाशिक : 4854, 4111, धाराशिव : 877, 800, पालघर : 5483, 2475, परभणी : 1056, 837 , पुणे : 15596, 14120, रायगड : 4256, 3404, रत्नागिरी : 929, 630, सांगली : 1886, 1285, सातारा : 1821, 1549, सिंधुदुर्ग : 287, 166, सोलापूर : 2320, 1900, ठाणे : 12263, 9060, वर्धा : 1111, 1044, वाशिम : 786, 676, यवतमाळ : 1940, 1768, एकूण : 101847, 82793.

Back to top button