सांगली जिल्हाधिकार्‍यांकडून ‘सिव्हिल’ची झाडाझडती | पुढारी

सांगली जिल्हाधिकार्‍यांकडून ‘सिव्हिल’ची झाडाझडती

सांगली, पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी गुरुवारी सायंकाळी येथील पद्भूषण वसंतदादा शासकीय रुग्णालयाला भेट देऊन झाडाझडती घेतली. याठिकाणी असलेल्या असुविधांचाही त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम आदी उपस्थित होते.

नांदेड आणि घाटी येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व शासकीय रुग्णालयांना जिल्हाधिकार्‍यांनी भेट देऊन अहवाल देण्याचे आदेश गुरुवारी दुपारी व्हिडीओ कॉन्फरन्सवरून दिले होते. शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवड्यामुळे रुग्णाचे हाल होत असल्याचे वृत्त दैनिक ‘पुढारी’मध्ये गुरुवारी प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी सायंकाळी सांगलीच्या शासकीय रुग्णालयाला भेट दिली.

जिल्हाधिकार्‍यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयातील सर्व विभाग प्रमुखांना सायंकाळी विभागात उपस्थित राहण्याच्या सूचना अचानक केल्या होत्या. सायंकाळी सात वाजता जिल्हाधिकार्‍यांनी अतिदक्षता विभागासह अनेक विभागाना भेटी दिल्या. रुग्णांचीही त्यांनी विचारपूस केली. यावेळी त्यांनी शासकीय रुग्णालयाला काय, काय सुविधांची गरज आहे, मनुष्यबळ आदींची माहिती घेतली. यासंदर्भात ते आता शासनाला अहवाल सादर करणार आहेत.

आदेश आल्यावर मग धावले…

शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा आहे. यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. औषधांसाठी जिल्हा नियोजन समितीकडेही रुग्णालयाच्या प्रशासनाने मागणी केली आहे. याकडेही जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. सांगलीचे रुग्णालय नामांकित रुग्णालयांपैकी एक असताना याठिकाणी तीन वर्षांपासून औषधांचा तुटवडा आहे. असे असताना जिल्हाधिकार्‍यांनी याची दखल घेतली नाही. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकार्‍यांना शासकीय रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागली.

Back to top button