कडेगाव तालुक्यात डेंग्यूचा धसका | पुढारी

कडेगाव तालुक्यात डेंग्यूचा धसका

कडेगाव, पुढारी वृत्तसेवा : मागील काही दिवसात कडेगाव शहरासह तालुक्यात डेंग्यूसदृश आजाराने भलतेच पछाडले असून याचा धसका अनेक नागरिकांनी घेतला असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. शहरात जवळपास आठ ते दहा तर तालुक्यात ही काही ठिकाणी डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले आहेत. मात्र याबाबत आरोग्य खाते व प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

शहरांसह तालुक्यातील ओढे, शेततळे आदी ठिकाणी पाण्याचे डबके भरल्याने डासांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे डेंग्यूच्या आजाराने त्रासलेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

अद्याप पाण्याचा निचरा झाला नसल्याने डेंग्यूच्या डासाला चांगलेच वातावरण अनुकूल झाले आहे. याचा परिणाम म्हणून शहरासह तालुक्यात सर्वत्र डास घोंगावत असताना दिसत आहेत. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर हिताना दिसत आहे.

याचबरोबर तालुक्यात ताप, थंडी, खोकला, सर्दी, पोटदुखी आदी विविध साथीच्या आजाराने विळख्यात घेतले आहे. त्यामुळे दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत. प्रशासन अधिकारी व कर्मचार्‍यांवर कोणाचा अंकुश नसल्याने आरोग्य खाते निर्धास्त असल्याचे चित्र दिसत आहे.

तालुक्यात डेंग्यूच्या आजाराने त्रासलेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. याबाबत तात्काळ उपाय योजना न केल्यास साथीच्या रोगांचा प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Back to top button