विट्यातील पाच गुन्हेगार एक वर्षासाठी तीन जिल्ह्यातून हद्दपार | पुढारी

विट्यातील पाच गुन्हेगार एक वर्षासाठी तीन जिल्ह्यातून हद्दपार

विटा : पुढारी वृत्तसेवा

घरफोडी सारखे गुन्हे वारंवार करणाऱ्या रेकॉर्डवरील विट्यातील पाच गुन्हेगारांना सांगली, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांतून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. याची माहिती विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली आहे.

याबाबत पोलिस निरीक्षक डोके म्हणाले, जिल्हा पोलिस अधिक्षक दीक्षित गेडाम, अपर पोलिस अधिक्षक श्रीमती मनिषा डुबुले, उपविभागिय पोलिस अधिकारी श्रीमती पद्मा कदम यांनी मालमत्तेविरुद्धच्या गुन्हयातील रेकॉर्डवरील आरोपींना हददपार करण्याबाबतच्या सूचना आम्हाला दिल्या होत्या. त्यानुसार आम्ही विटा पोलिस ठाणे हद्दीमधील मालमत्ते विरुध्दच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपिंच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती संकलीत करुन त्यांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्याप्रमाणे आरोपी गणेश संभाजी तुपसौंदर्य (वय ३५), सुरज मनोज कांबळे (२१), प्रमोद मधुकर यादव (३०), रोहित श्याम कांबळे (२४), गणेश अशोक घेवदे (२५), आकाश ऊर्फ अतिश राजु वायदंडे (सर्व राहणार विटा, ता. खानापूर) हे आरोपी रात्रीच्या वेळेस चोरी, घरफोडी सारखे गुन्हे करीत असून ते न्यायालयाकडून जामिनावर सुटल्यावर सुद्धा पुन्हा अशाच प्रकारचे गुन्हे करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्या अशा संघटीत टोळीच्या कृत्यामुळे नागरिकांच्या मालमत्तेस धोका पोहचत आहे. त्याचा जनमानसावर आणि विटा परिसरातील नागरिकांवर विपरीत परीणाम होत आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे सादर करण्यात आला होता.

त्याप्रमाणे पोलीस अधिक्षकांनी रेकॉर्डवरील या पाचही गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे सांगली, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यातून एक वर्ष कालावधीकरीता हद्दपार करण्यात आले आहे असेही पोलिस निरीक्षक डोके यांनी सांगितले.

Back to top button