सांगलीत मोर, लांडोरची शिकार! | पुढारी

सांगलीत मोर, लांडोरची शिकार!

सांगली, पुढारी वृत्तसेवा : शहरात मोर आणि लांडोरची शिकार केल्याचा प्रकार उघडकीस आला. नागरिकांनी पाठलाग केल्याने टोळीने पलायन केले. यावेळी एक अल्पवयीन तरुण मात्र नागरिकांच्या तावडीत सापडला. पोलिसांनी शिकार केलेले मोर आणि लांडोर जप्त केले आहे.

जुना बुधगाव रस्त्यावरील संभाजी कॉलनीमध्ये काही तरुण मोर आणि लांडोरची शिकार करण्यासाठी जाळी लावून बसले होते. अवघ्या काही मिनिटांत त्यांनी मोर आणि लांडोरची शिकार केली. त्यानंतर ते पोत्यात भरून निघाले होते. दरम्यान, या परिसरात राहणार्‍या काही नागरिकांना ‘त्या’ तरुणांचा संशय आला. त्यामुळे त्यांनी घटनास्थळी पोते टाकून पलायन केले. परंतु नागरिकांनी पाठलाग करून अल्पवयीन तरुणास पकडले. अन्य संशयितांनी मात्र पोबारा केला. पोते उघडल्यानंतर मोरांची शिकार झाल्याचे निदर्शनास आले. पोलिस आणि प्राणिमित्र घटनास्थळी दाखल झाले. राष्ट्रीय पक्षाची शिकार झाल्याने प्राणी मित्रांतून तीव्र संताप व्यक्त होत होता. वारंवार कळवून देखील वन विभागाचे अधिकारी अथवा कर्मचारी त्या ठिकाणी न आल्याने प्राणिमित्र संतप्त झाले होते.

Back to top button