सांगली जिल्हा परिषदेतील पदाधिकार्‍यांचे उद्या राजीनामे | पुढारी

सांगली जिल्हा परिषदेतील पदाधिकार्‍यांचे उद्या राजीनामे

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्हा परिषदेतील पदाधिकार्‍यांचे राजीनामे सोमवारी (दि. 25) घेण्यात येणार आहेत. नवीन निवड 15 दिवसांत करण्यात येईल, असा निर्णय शनिवारी भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत झाला.

संग्रामसिंह देशमुख यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर प्राजक्‍ता कोरे यांना संधी देण्यात आली. त्यावेळी दीड वर्षानंतर पदाधिकारी बदल करण्याचे ठरले होते. परंतु; महापालिकेत राजकीय धक्का बसल्याने जिल्हा परिषदेत बदल करण्याबाबत भाजपच्या कोअर कमिटीत मतमतांतरे होती. त्यामुळे बदल करण्यास सतत टाळाटाळ सुरू होती. यातून इच्छुक नाराज झाले. काहींनी पक्ष सोडला. इतरांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्वाणीचा इशारा दिला. तसेच खासदार संजय पाटील यांनी यासाठी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला होता.

त्यामुळे प्रदेशस्तरावरील नेत्यांनी जिल्ह्यातील नेत्यांना बदल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गेल्या आठवड्यात एक बैठक झाली. त्यावेळी मित्र पक्ष व विद्यमान पदाधिकारी यांना विश्‍वासात घेऊन निर्णय घेण्याचे ठरले. त्यानुसार जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांनी सर्वांशी चर्चा केली आहे. त्यामुळे अंतिम निर्णय घेण्यासाठी आज कोअर कमिटीची बैठक झाली.

या बैठकीला जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, खासदार संजय पाटील, पश्‍चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, आमदार सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, पृथ्वीराज पवार, नीता केळकर, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, सत्यजीत देशमुख, सरचिटणीस सुरेंद्र चौगुले, मिलिंद कोरे दिनकर पाटील, सम्राट महाडिक उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांचे राजीनामे सोमवारी घेण्याचे ठरले. या निणर्यानुसार समितीचे सभापती अध्यक्षाकडे राजीनामे देतील. ते मंजूर करून अध्यक्ष पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा देतील. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल.

सांगली जिल्हा परिषदेतील पुढील 15 दिवसांत नवीन पदाधिकारी यांची निवड होईल. यात अध्यक्ष, उपाध्यक्ष प्रथम निवडण्यात येतील. त्यानंतर समिती सभापतींची निवड करण्यात येईल, असे भाजपकडून सांगण्यात आले. बदल करण्याचे ठरल्याने इच्छुकांनी लॉबिंग सुरु केले आहे.

बाबा, काकांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार

भाजपचे संख्याबळ पाहता बहुमताच्यावेळी घोरपडे गट, शिवसेना, रयत आघाडी यांना बरोबर घ्यावे लागणार आहे. त्यासाठी मित्र पक्षांशी चर्चा सुरू आहे. काहींनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. अवधी कमी असल्याने काहींनी बदल करण्यास नकार दिला होता. तसेच काँग्रेसने निवडीवेळी तटस्थ किंवा गैरहजर राहावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.

अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतिपदासाठी अनेक इच्छुक

बदल करण्याचे ठरल्याने इच्छुकांनी लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे. अध्यक्षपदासाठी सरिता कोरबू, अश्‍विनी पाटील, अ‍ॅड. शांता कनुंजे इच्छुक आहेत. उपाध्यक्षपदासाठी डी. के. पाटील, संपतराव देशमुख स्पर्धेत आहेत. सुरेंद्र वाळवेकर, अरुण बालटे, मनोज मुंडगनूर, रेश्मा साळुंखे, वंदना गायकवाड, मोहन रणदिवे, स्नेहलता जाधव, रेखा बागेळी, मंगल नामद, निजाम मुलाणी, सुरेखा जाधव, संगीता पाटील या सभापतिपदाच्या शर्यतीत आहेत.

Back to top button