Mhaisal Irrigation Scheme : गुड्डापूर येथे पर्यावरण विषयक जन सुनावणी संपन्न; विस्तारित म्हैसाळ योजनेस एकमत | पुढारी

Mhaisal Irrigation Scheme : गुड्डापूर येथे पर्यावरण विषयक जन सुनावणी संपन्न; विस्तारित म्हैसाळ योजनेस एकमत

जत; पुढारी वृत्तसेवा : जत तालुक्यातील वंचित असलेल्या गावांना वरदायी ठरणारी म्हैसाळ सिंचन योजनेच्या संदर्भात पर्यावरण विभागाने गुड्डापूर (ता.जत) येथे जन सुनावणी आयोजित केली होती. या सुनावणीत लोकप्रतिनिधी सह जनतेने कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ही योजना मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या जन सुनावणीसाठी आमदार विक्रमसिंह सावंत, पर्यावरण जनजागरण समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह पाटील, म्हैसाळ उपसा योजनेचे कार्यकारी अभियंता सचीन पवार, पर्यावरण जनजागृती समितीचे आयोजक नवनाथ अवताडे, पर्यावरण जनजागृती समितीचे सदस्य जगन्नाथ साळुंखे यांच्यासह संखचे अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे, जतचे तहसीलदार जीवन बनसोडे, चिककलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज, अंकुश हूवाळे, नागनाथ मोटे, आप्पासाहेब बिराजदार ,श्रीधानम्मा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष सिध्दय्या स्वामी, विश्वस्त चंद्रशेखर गोब्बी, लक्ष्मण कोरे ,बसवराज बिराजदार ,सुभाष गोबी आदी उपस्थित होते.

विस्तारित म्हैसाळ योजनेत समाविष्ट असणाऱ्या 65 गावातील सरपंच व लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती. नव्यानेच होऊ घातलेल्या म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजने अंतर्गत पर्यावरण विषयक कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून आज जाहीर जन सुनावणी गुड्डापूर येथे घेण्यात आली विस्तारित म्हैसाळ योजनेत पूर्वीच्या म्हैसाळ योजनेतून वंचित असणारी 48 गावे अंशतः वंचित असणारी 17 गावे अशी एकूण 65 गावांना एकाच योजनेतून सिंचनाचा लाभ देण्यासाठी म्हैसाळ टप्पा क्रमांक तीन बेडग येथून नवीन स्वतंत्र उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणीपुरवठा करता येणे शक्य आहे शासनाच्या मंजुरीस अधीन राहून एकूण सहा टप्प्याद्वारे हे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणार आहे सध्या या योजनेच्या अंदाजपत्रके तयार करून अंदाजपत्रकांना सक्षम स्तरावर मान्यता देऊन अंतिम कामाची निविदा प्रक्रिया प्रगतीत आहे. जरी पर्यावरण विषयक जाहीर जन सुनावणी असली तरी उपस्थित लोकप्रतिनिधींनी सध्या अस्तित्वात असणाऱ्या म्हैसाळ योजने संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करून अधिकाऱ्यांना जाब विचारला. पर्यावरण विषयक कोणतीही समस्या नागरिकांनी उपस्थित केली नाही यामुळे पर्यावरणासंदर्भातील कोणताही अडथळा सदर योजनेस येणार नाही. सध्या जी म्हैसाळ योजना सुरू आहे ती अद्यापही पूर्ण झालेली नाही ती पूर्ण करण्यास अजून किती कालावधी लागणार आहे व ती पूर्ण क्षमतेने चालण्यास किती पाणी लागणार आहे ते पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे का असे अनेक प्रश्न विचारण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले की, सध्या अस्तित्वात असणारी म्हैसाळ योजना ही प्रथमतः पूर्ण करणे गरजेचे आहे अजूनही ती योजना अपूर्ण असून त्या योजनेसाठी म्हणावा तेवढा निधी उपलब्ध होताना दिसून येत नाही सध्या सदर योजनेचे कॅनल सोडून पाईपलाईनची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत मात्र ती अपूर्ण आहेत ती सर्व कामे पूर्ण करून ज्याच्या शेवटच्या टोकापर्यंत कशा पद्धतीने पाणी जाता येईल हे पाहणे गरजेचे आहे लकडेवाडी येथून पुढे उमदीकडे जाणारी पाईपलाईन कॅनलचे पाणी डायरेक्ट पाईपलांइनमध्ये सोडल्यामुळे वरून येणारा कचरा हा पाईपलाईन मध्ये अडकून पाईपलाईन बंद पडत आहेत. सदर पाईप लाईन मध्ये अडकणारा कचरा कशा पद्धतीने थांबता येईल याचे नियोजन अद्यापही झालेले दिसून येत नाही ते करणे गरजेचे आहे. विस्तारित म्हैसाळ योजनेमधून पूर्णतः 48 व अंशतः 17 गावे समाविष्ट केलेली दिसून येत आहेत मात्र या योजनेतून पाणी उपलब्ध झाले तर ते पाणी साठवणूक करून ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारची योजना शासनाने आखली आहे या संदर्भात कोणताही खुलासा झालेला दिसून येत नाही एखाद्या गावाला पाझर तलाव ही नाही व साठवण तलाव नाही त्या गावातील शेतकऱ्यांना कशा पद्धतीने पाणी देण्याचे नियोजन शासनाने केले आहे याचाही खुलासा होणे गरजेचे आहे मात्र तसे झाल्याचे दिसून येत नाही या संदर्भात 65 गावांमध्ये योजना राबवण्याच्या अगोदरच मोठ्या प्रमाणात शेततलाव निर्माण करावी लागतील तरच या योजनेचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होणार आहे अन्यथा येणारे पाणी हे शेतकऱ्यांना मृगजळच ठरणार आहे .विस्तारित म्हैसाळ योजना व सध्या सुरू असणारा म्हैसाळ सहावा टप्पा प्रकल्प या संदर्भात अनेक गावच्या लोकप्रतिनिधींनी अनेक प्रश्न उपस्थित केले त्यास पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता सचीन पवार यांनी उत्तरे दिली व जनतेच्या भावना लक्षात घेऊन जनतेच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही शासन दरबारी पोहोच करू असे आश्वासन दिले आहे.

Back to top button