सांगली : परदेशातील मुलांची जिल्ह्यात तस्करी! | पुढारी

सांगली : परदेशातील मुलांची जिल्ह्यात तस्करी!

सांगली; सचिन लाड : अंगात फाटकी कपडे…केस वाढलेले…पोटाचे नेहमीच हाल…कुटुंब उपाशी…कामधंदा काहीच नाही…शिक्षणाचे तर आभाळच…जगायचे कसे, असा प्रश्न पडलेल्या नेपाळ, उत्तराखंड व बांगलादेश येथून अल्पवयीन मुलांची सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात आहे. या मुलांचा हॉटेल व एमआयडीसीमध्ये मागेल तसा पुरवठा करणारी ठेकेदारांची मोठी टोळी सक्रिय आहे. प्रत्येक मुलामागे त्याच्या पगारातील एक हजार रुपये प्रतिमहिना हे ठेकेदार घेत आहेत.

पगार आठ हजार!

नेपाळ, बांग्लादेश व आपल्याकडील उत्तराखंड येथून सध्या जिल्ह्यात 12 हजारांहून अधिक मुलांना वेटबिगारासारखे राबवून घेत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. साधारपणे 13 ते 17 वयोगटातील ही मुले आहेत. त्यांना सकाळी चहा, दुपारी व रात्रीचे जेवण दिले जाते. जिथे काम करतात, तिथेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महिन्याला साधारणपणे आठ ते नऊ हजार पगार दिला जात आहे. हा पगारही त्यांना वेळेवर मिळत नाही. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने ही मुलेही अश्रू ढाळत निमूटपणे काम करीत आहेत.

दलाल संपर्कात!

नेपाळ, उत्तराखंड, चीन व बांगलादेशमध्ये अनेक दलाल या मुलांची तस्करी करण्याचा व्यवसाय करीत आहेत. मुलांच्या घरच्या परिस्थितीचा अंदाज घेत ते कुटुंबाच्या संपर्कात येतात. कुटुंबाला चार-पाच हजार रुपये देऊन मुलाला भारतात चांगल्या पगाराची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवितात. त्यानंतर मग ते महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हॉटेल, एमआयडीसी, बांधकाम क्षेत्र, खनिज उत्खनन, चिरमुरे भट्टी, विटभट्टी, ढाबा, शेतात, पोल्ट्री या ठिकाणी मुलांचा पुरवठा करतात. जिथे कामाला सोडयचे आहे, त्या संबंधित मालकाशी ते प्रत्येक मुलाचा महिन्याचा जो काही पगार होईल, त्यातील एक हजार रुपये द्यावे लागतील, असा करार करून घेतात.

मुलांना आठवड्याची सुट्टीही दिली जात नाही. काही कारणास्तव मालकाने व्यवसाय बंद ठेवला तरच सुट्टी मिळते. अन्यथा सकाळी नऊपासून ते रात्री बारापर्यंत त्यांना नुसते राबवून घेतले जात आहे. केवळ दुपारच्यावेळी दोन-तीन तास सुट्टी दिली जाते. अनेक मुले कामाची पद्धत पाहून फार महिने राहत नाहीत. जो काही पगार जमा आहे, तो घेऊन ते पुन्हा त्यांच्या गावाला निघून जातात.

कमी पगार…राबणूक जास्त!

जिल्ह्यातील कामगारांना किमान पाचशे ते सहा रुपये पगार द्यावा लागतो. आठ तासाचीच ड्युटी द्यावी लागते. त्यामुळे परदेशातील मुलांना आठ-नऊ हजार पगार देऊन काम करून घेतले जात आहे. परिस्थितीमुळे ही मुलेही काम करतात. गावाकडे जायचे म्हटले तर किमान दहा हजार रुपये खर्च येतो. जेवण-खाणे व राहण्याची सोय असल्याने तो खर्च त्यांचा वाचतो. वर्षातून एकदाच मालकाकडून सर्व पगार घेऊन ते गावी निघून जातात. गेल्या पाच वर्षातच परदेशातील मुलांची येथे कामासाठी तस्करी करण्याचे प्रमाण वाढले आहे.

Back to top button