सांगलीत भाजत्या उन्हावर पावसाचा शिडकावा | पुढारी

सांगलीत भाजत्या उन्हावर पावसाचा शिडकावा

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात आणि सांगली शहरात उन्हाचा पारा इतका चढला होता की अंग भाजून जाते की काय अशी लाहीलाही होत होती. हा पारा 37-38 अंशांपर्यंत गेला आणि सांगलीचे रस्ते ओस पडले. सकाळी 9 वाजल्यापासूनच भाजत जाणारे ऊन दुपारी आग ओकत होते, पण सायंकाळी या उन्हाचा पारा पावसाच्या हलक्या सरींनी पार गार करून टाकला. भाजत्या उन्हावर पावसाचा शिडकावा झाला आणि निसर्गासोबत माणसालाही गारवा मिळाला.

सकाळी 9 वाजल्यापासून कडाक्याचे ऊन, दुपारी ढग आणि संध्याकाळी पाऊस..निर्सगाचा निराळाच नुर आज जाणवत होता. संध्याकाळी मग अचानक पावसाच्या सरी आल्या. अगोदर जोराचा वारा, नंतर विजांचा थयथयाट करत पाऊस आला आणि तासभर बरसत राहिला. सांगली आणि परिसराला तर पावसाने तासभर झोडपूनच काढले. गारांचा मारा झाला. अर्ध्या तासात वातावरण गारेगार झाले. वार्‍यामुळे वीज गायब झाली. सांगलीचा बराचसा भाग रात्री उशिरापर्यंत अंधारातच होता.

तासगाव तालूक्यातही काही भागात विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. आटपाडीतही दहा पंधरा मिनीटे पाऊस झाला. आष्टा परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले तर शिराळा-विटा-कडेगाव-जतला पावसानं हूलकावणी दिली.

Back to top button