मिरजेत महिलेवर कुर्‍हाडीने जीवघेणा हल्ला | पुढारी

मिरजेत महिलेवर कुर्‍हाडीने जीवघेणा हल्ला

मिरज; पुढारी वृत्तसेवा :  शहरातील पूर्व म्हाडा कॉलनीमध्ये पूर्ववैमनस्यातून एका महिलेवर दोघांनी कुर्‍हाडीने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये राधिका कांबळे (वय 25) ही महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेवर शासकीय रग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, जखमी राधिका कांबळे व जुनेद रफीक मुश्रीफ अणि शाकीर जलील शेख यांच्यामध्ये पूर्वीपासून वाद आहे. या रागातून तिच्यावर हल्ला करण्यासाठी मुश्रीफ आणि शेख हे दोघे शहरातील म्हाडा कॉलनीमध्ये दबा धरून बसले होते. राधिका कांबळे या म्हाडा कॉलनी येथे घराजवळ आल्या असता दोघांनी त्यांच्यावर कुर्‍हाडीने हल्ला केला. डोक्यात कुर्‍हाडीचा वर्मी घाव बसल्याने राधिका कांबळे या गंभीर जखमी झाल्या. हल्ल्यानंतर जुनेद मुश्रीफ याने पलायन केले. शाकीर शेख याला म्हाडा कॉलनी येथील नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. याबाबत एका मोबाईल कॅमेर्‍यात चित्रीकरण झाले आहे. कुर्‍हाडीने झालेल्या हल्ल्यात राधिका कांबळे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनस्थळी धाव घेतली. पोलिसांनी शाकीर याला ताब्यात घेतले आहे. राधिका कांबळे यांनी जुनेद मुश्रीफ याच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दिली होती. पूर्वीपासूनच्या रागातून हा हल्ला झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Back to top button