सांगली बाजार समिती निवडणुक : नऊ माजी संचालकांना दणका; अर्ज अवैध | पुढारी

सांगली बाजार समिती निवडणुक : नऊ माजी संचालकांना दणका; अर्ज अवैध

सांगली : पुढारी वृत्तसेवा : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मागील संचालक मंडळातील नऊ माजी संचालकांचे अर्ज अवैध ठरवले. समितीच्या कामातील अनियमितता, अपहाराचा ठपका ठेवत त्यांना अपात्रतेचा दणका बसला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी हा निर्णय दिला.

दरम्यान, बुधवारी रात्री झालेल्या छाननीमध्ये माजी सभापती सिकंदर जमादार यांच्यासह दिग्गज 51 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. एकूण 510 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून आता माघारीकडे लक्ष लागले आहे.

सांगली बाजार समितीची निवडणूक रणधुमाळी जोरदार सुरू झाली आहे. समितीच्या 18 जागांसाठी विक्रमी 598 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. बुधवारी छाननी सुरू झाल्यानंतर माजी सरपंच अनिल शेगुणसे यांनी बाजार समितीच्या नऊ माजी संचालकांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला. माजी संचालकांनी गैरव्यवहार केला असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांचे अर्ज अवैध ठरवावे, अशी मागणी केली. त्यामध्ये संतोष पाटील, प्रशांत शेजाळ, वसंत गायकवाड, दीपक शिंदे, आण्णासाहेब कोरे, अभिजित चव्हाण, मुजीर जांभळीकर, बाळासाहेब बंडगर आणि अजित बनसोडे यांचा समावेश आहे. त्याशिवाय माजी संचालक वसंतराव गायकवाड यांनी शेगुणसे शेतकरी नाहीत, त्यांच्या नावावर जमीन नाही, तरीही त्यांनी शेतकरी म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज अपात्र ठरवण्याची मागणी केली. दोन्ही गटांकडून घेण्यात आलेल्या हरकतीवर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी बुधवारी रात्री सुनावणी घेतली. मात्र सुनावणीवरील निर्णय राखून ठेवण्यात आला होता. दोन्हीकडील बाजू जाणून घेतल्यानंतर बाजार समितीतील संचालकांच्या कारभारावर चौकशी अहवालातील आक्षेपामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सुरवसे यांनी नऊ माजी संचालकांचे अर्ज अवैध ठरविले.
सांगली बाजार समितीसाठी एकूण 598 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. यापैकी माजी सभापती, संचालकांसह दिग्गज 51 उमेदवारांचे अर्ज अपात्र झाले आहेत. यामुळे या दिग्गज इच्छुकांना बाजार समितीच्या निवडणुकीपासून दूर राहावे लागणार आहे. त्यामध्ये सिकंदर जमादार, महाबळेश्वर चौगुले आदींचा समावेश आहे.

दरम्यान, बाजार समिती निवडणुकीमध्ये माजी संचालकांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेणारे अनिल शेगुणशे यांचाच अर्ज छाननीमध्ये बाद झाला. शेतकरी नसताना त्या गटातून अर्ज भरल्याने माजी संचालक वसंतराव गायकवाड यांनी हरकत घेतली होती. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी तलाठ्यामार्फत पडताळणी करून शेगुणशे यांच्या शेती मालकीची खात्री केली. संबंधित तलाठ्याने नजरचुकीने शेतकरी असल्याचा दाखला दिल्याचे लेखी खुलासा सादर केला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी शेगुणशे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविला. सहायक निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण, गणेश काटकर यांनीही सुनावणीत सहकार्य केले.

अवैध संचालकांची पणन संचालकांकडे धाव

बाजार समितीच्या निवडणुकीत नऊ माजी संचालकांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आल्याने त्यांना धक्का बसला. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी घेतलेल्या निर्णयावर हरकत घेण्यासाठी पणन संचालकांकडे धाव घेतली आहे. जिल्हा उपनिबंधकांच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. आता पणन संचालकांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

Back to top button