जत; पुढारी वृत्तसेवा : Sangli : सोनलगी (ता. जत, जि. सांगली) येथे बोर नदीच्या काठावर कपडे धुण्यास गेलेली अपंग महिला वाहून गेली. या दुर्दैवी घटनेत त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सोनाली तुकाराम कांबळे (वय २६) असे दुर्दैवी महिलेचे नाव आहे. मंगळवारी सकाळी बोर नदीच्या काठावर मृतदेह तरंगताना बाहेर काढला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या दिवाळी व दसरा सणाच्या निमित्ताने घरातील स्वच्छता सुरू आहे. पूर्व भागातील बोर नदीला पाणी असल्याने महिला कपडे धुण्यासाठी गर्दी करत आहेत, दरम्यान सोनाली कांबळे या सोमवारी दुपारी तीन वाजता कपडे धुण्यास गेल्या असता पाय घसरून पाण्यात पडल्या. ही घटना समजातच तत्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले.
सांगलीहून ( Sangli ) जीव रक्षक बचाव पथक बोलावण्यात आले होते. मात्र ते रात्री उशिरापर्यंत पोहोचले नाही. तसेच पाण्याचा वेग जास्त असल्याने शोध घेण्यास गावक-यांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. अखेर मंगळवारी सकाळी नदीपात्रात मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यानंतर सोनाली कांबळे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या मृतदेहाचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे.
सोनाली यांच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्याही अपंग होत्या. त्यांना एक मुलगी व एक मुलगा आहे. मोलमजुरी करून त्या आपला उदरनिर्हाक करत होत्या. दुर्दैवाने बोर नदीच्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दोन्ही मुले अनाथ झाली आहेत. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.