डोडोमा : आफ्रिकेत अतिशय अनोखे जीवही आढळतात. त्यामध्ये प्रसंगी माणसाच्या जीवालाही धोका निर्माण करू शकणार्या लाल मुंग्यांचा समावेश होतो. तिथे बेडकांचीही एक अशी प्रजाती आहे जी चक्क विषारी सापालाही मारून खाऊ शकते. अतिशय बळकट अशा या बेडकांना 'आफ्रिकन बुलफ्रॉग' असे म्हटले जाते.
बेडूक कितीही फुगला तरी तो बैल होत नाही, अशा अर्थाची एक गोष्ट आहे. मात्र, या बेडकांचे पिळदार शरीर, आक्रमकपणा आणि प्रचंड क्षमता पाहून त्यांना 'बुलफ्रॉग' असेच म्हटले जाते. त्यांची लांबी 10 ते 12 इंचांपर्यंत असते व सरासरी वजन 1.4 किलो ते 2 किलोंपर्यंत असते. अनेक वेळा त्यांचे वजन 3 ते 3.4 किलो असल्याचेही आढळून आले आहे.
असे बेडूक केवळ आफ्रिकेतच आढळतात. ते अतिशय विषारी आणि आक्रमक असतात. टांझानिया, अंगोला, बोत्सवाना, केनिया, मलावी, मोझाम्बिक, नामिबिया, दक्षिण आफ्रिका, स्वाझिलँड, झाम्बिया, झिम्बाब्वे आणि कांगो या देशांमध्ये ते मोठ्या संख्येने आढळतात.
त्यांच्या आहारात उंदीर, अन्य सामान्य बेडूक, छोटे पक्षी, सरडे, पाली आणि अगदी विषारी सापही असतात. दलदलीच्या, झाडेझुडपे असलेल्या भागात तसेच नदी, सरोवरांच्या जवळ हे बेडूक असतात.