शाहुवाडी तालुक्यातील कापशी येथील आरव राजेश केसरकर या पाच वर्षाच्या बालकाचे अपहरण करून गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी पहाटे उघडकीला आली. निष्पाप बालकाच्या मृतदेहावर हळद कुंकू, गुलाल आढळून आल्याने हा नरबळीचा प्रकार असावा अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे. पोलिसांनी या घटनेचा वेगाने तपास सुरू केला आहे.
या अमानुष व क्रूर घटनेमुळे शाहुवाडी तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता आरव मित्रांसमवेत अंगणात खेळत होता. साडेसहा वाजता तो अचानक बेपत्ता झाला. नातेवाईकांनी शोध घेतला पण रात्री उशिरापर्यंत आरव सापडला नाही. नातेवाईकांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
काल सोमवार सकाळपासून नातेवाईकांसह पोलिसांनी सारा परिसर पिंजून काढला. पण मुलाचा पत्ता लागला नव्हता. आज सकाळी राकेश केसरकर यांच्या घराच्या पिछाडीला काही अंतरावर आरवचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर हळद कुंकू आणि गुलाल टाकल्याचे निदर्शनास आल्याने ही बातमी कापशी सर पंचक्रोशीत वार्यासारखी पसरली. घटनास्थळी नातेवाईक, ग्रामस्थ नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक प्रमोद जाधव यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे मारेकऱ्यांच्या शोधासाठी पोलिसांचे चार पथके ठिकाणी रवाना झाले आहेत.
निष्पाप वडील सेंट्रींग कारागीर आहेत त्यांचा हा दोन क्रमांकाचा मुलगा असून या घटनेमुळे केसरकर कुटुंबीय दुःखाचा डोंगर कोसळला आहे आरव चा मृतदेह पाहून आई-वडिलांनी हंबरडा फोडला.
वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेहावर हळद कुंकू, गुलाल टाकल्याने हा नरबळीचा प्रकार असावा अशी नातेवाईकांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना शंका आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला गती दिली आहेत. निष्पाप आरवचे कोणी आणि कशासाठी अपहरण केले हा तपासाचा मूळ मुद्दा आहे. खुनानंतर मृतदेहावर हळद कुंकू टाकल्याने या प्रकरणामागे कोणाचा हात आहे. याचाही पोलीस शोध घेत आहेत.
सावर्डे (तालुका कागल) येथील निष्पाप वरद पाटील या निष्पाप बालकाच्या हत्येनंतर शाहुवाडी तालुक्यात घडलेल्या या प्रकारामुळे संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी मारेकर्याचा तातडीने छडा लावून त्याला बेड्या ठोकाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.