सांगली : गांजा तस्करीचे सांगली आंतरराज्य केंद्र? | पुढारी

सांगली : गांजा तस्करीचे सांगली आंतरराज्य केंद्र?

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सहा महिन्यांपासून गांजा पकडण्याची सातत्याने कारवाई होत असल्याने सांगली तस्करीचे मुख्य आंतरराज्य केंद्र बनले आहे. परजिल्ह्यातील तस्करांनी सांगलीत शिरकाव केला आहे. त्यांना स्थानिक गुन्हेगारांची ‘रसद’ मिळत आहे. परिणामी तस्करीचा हा बाजार जिल्हाभर पसरला आहे.

बडे’ मासे मोकाटच!

पोलिसांच्या कारवाईत आतापर्यंत ‘छोटे’ मासेच गळाला लागले आहेत. ‘बडे’ मासे मोकाट आहेत. यातून तस्करीचा हा धंदा जोमात सुरू आहे. यामध्ये तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली आहे. परिणामी, अनेकांची पावले गुन्हेगारीकडे वळली आहेत. गांजाचे सेवन करून नशेत तर्रर्र होऊन चोरी, घरफोडी, चेनस्नॅचिंगचे गुन्हे केले जात आहे.

जत, कर्नाटकातून तस्करी!

जिल्ह्यात आंध्र प्रदेश, जत आणि कर्नाटकातून गांजाची तस्करी होत असल्याचे पोलिसांच्या कारवाईवरून वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. कर्नाटकातील अनेक भागात तर गांजाची शेतीच पिकविली जात आहे. कर्नाटकातून गोव्यातही गांजाची तस्करी होत आहे.
कुपवाडमध्ये गांजा गोळीची विक्री

खास करून कुपवाड येथे गांजाची गोळी करून विकली जात आहे. यातून दररोज तीन लाख रुपयांची उलाढाल होत आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीतून गांजा तस्कर खुलेआम या गोळीची विक्री करत असल्याचे चित्र आहे. यातील अनेकजण सुरुवातीचे तीन दिवस मोफत गोळी देतात. चौथ्यादिवशी मात्र पैसे घेऊनच गोळी दिली जाते.

‘गॉडफादर’ कोण? आश्रय कोणाचा?

गांजाचे उत्पादन, तस्करी व विक्री करणारे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांचा ‘गॉडफादर’ कोण? त्याला कोणाचा आश्रय आहे? याची पाळेमुळे खणून काढल्याशिवाय तस्करी बंद होणार नाही. कवठेपिरान येथे पकडलेल्या गांजा प्रकरणात एका संशयिताविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा मुळापर्यंत जाऊन तपास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आणखी काहींना अटक होण्याची शक्यता आहे.

‘राज्य उत्पादन शुल्क’ नेमके करतेय काय?

अमली पदार्थाची तस्करी प्रकरणात कारवाई करण्याची खरी जबाबदारी राज्य?उत्पादन शुल्क विभागाची आहे. गेल्या वर्षभरापासून पोलिस यंत्रणा गांजा तस्कर, विक्रेत्यांवर कारवाई करीत आहे. उत्पादन शुल्क विभागाने तीन महिन्यापूर्वी शिपूर (ता. मिरज) येथे गांजाच्या शेतीवर धाड टाकली. पण याचा त्यांनी मुळापर्यंत तपास केला नाही. प्रकरण गुंडाळूनच टाकले. त्यानंतर या विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही.

दुचाकीवरून मागेल तिथे पुरवठा

सांगलीत तस्करी झालेल्या गांजाचा मागेल तिथे पुरवठा केला जात आहे. सातारा, कर्‍हाड, जयसिंगपूर यासह कोठे पाहिजे तिथे दुचाकीवर चार-पाच किलोचे पोते घेऊन अगदी सहजपण तो पोहोच केला जातो आहे. दोन महिन्यात कर्नाटक व पुण्यातील तस्करांना अटक केली. त्यांचे स्थानिक गुन्हेगारांशी लागेबांधे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

उपनगरामध्ये विक्रीचे अड्डेच!

शहरातील उपनगरामध्ये गांजा विक्रीचे अड्डेच आहे. दीडशेची पुडी आता सर्रास दोनशे रुपयाला विकली जात आहे. विक्री करणारी मोठी साखळी आहे. या साखळीतून गेले तरच गांजा विकत मिळते. मिरज, कुपवाडमध्येही विक्री करणार्‍या पाच ते सहा टोळ्या सक्रिय आहेत. सांगलीतील ‘डी’ गँगकडून विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

जत, शिराळा, मिरज तालुक्यात शेतीच!

जत, शिराळ्यातील काही भाग व मिरज पूर्वभागात गांजाची शेतीच पिकविली जात आहे. उसाच्या फडात गांजाची लागवड केली जाते. गांजाची झाडे जशी वाढू लागतीस, तसा त्याचा वास दरवळतो. एखाद्या व्यक्तीने तक्रार केली तरच मग पोलिसांकडून छापा टाकला जातो. एक एकरात गांजा लागवडीतून किमान दहा लाखाचे तरी उत्पन्न मिळते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.

गांजा सेवनाचे शरीरावर मोठे दुष्परिणाम होतात. चिडचिडेपणा, लक्ष केंद्रित नसणे, भीती वाटणे, अतिझोप येणे किंवा झोपच न लागणे, दुसर्‍यांबद्दल संशय येणे, विश्वास कमी होणे हे परिणाम होतात. सतत आजारीही पडतात. पोटदुखीचा त्रास होतो. सातत्याने नशेत राहण्याची इच्छा होते.
– डॉ. प्रदीप पाटील, मानसोपचार तज्ज्ञ, सांगली

गांजा तस्करीची पाळेमुळे खणून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. सातत्याने जिल्ह्यात कोठे ना कोठे गांजा जप्त करण्याची कारवाई केली जात आहे. गांजा तस्करीत मोठी साखळी आहे. साखळीच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यादृष्टीने तपास केला जात आहे.
– सतीश शिंदे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, सांगली

Back to top button