Apple Cultivation : जतच्या दुष्काळात फुलले काश्मीरचे नंदनवन; सफरचंदाची यशस्वी लागवड | पुढारी

Apple Cultivation : जतच्या दुष्काळात फुलले काश्मीरचे नंदनवन; सफरचंदाची यशस्वी लागवड

जत; विजय रूपनूर : संपूर्ण भारतात सफरचंदाची लागवड (Apple Cultivation) ही प्रामुख्याने जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड यासह काही उत्तर भारतीय भागात होते. या पिकाला थंड हवामानाची आवश्यकता असल्याने सफरचंद ही आजपर्यंत उत्तर भारताची मक्तेदारी होती. पण, सांगली जिल्ह्यातील जतसारख्या केवळ दुष्काळी नव्हे तर वाळवंटी भागातही सफरचंदाची यशस्वी लागवड होवू शकते हे इथल्या एका शेतकर्‍याने दाखवून दिले आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात भविष्यात द्राक्ष आणि डाळिंबाप्रमाणे सफरचंदाच्या बागा बहरल्या तर आश्चर्य वाटायला नको.

जत तालुक्याच्या अंतराळ या गावातील काकासाहेब सावंत हे एक प्रयोगशील आणि प्रगतीशील शेतकरी आहेत. काही वर्षांपासून त्यांच्या मनात आपल्या शेतीत सफरचंदाची लागवड (Apple Cultivation) करण्याचे विचार सुरू होते. मात्र सफरचंद लागवडीसाठी थंड हवामान लागते, असे ते ऐकून होते आणि जतसारख्या दुष्काळी भागात तर तिन्ही त्रिकाळ कडक उन्हाचा आगडोंब! त्यामुळे त्यांनी हिमाचल प्रदेशात जावून सफरचंदाची लागवड करणार्‍या काही शेतकर्‍यांशी चर्चा केली, त्यांचे मार्गदर्शन घेतले आणि धाडसाने सफरचंदाची लागवड करायचीच असा निर्णय घेतला. सफरचंदाची अधिक सखोल माहिती मिळविण्यासाठी गुगलवरूनही बरीच माहिती गोळा करून त्याचा अभ्यास केला.

सुरुवातीला त्यांनी हिमाचल प्रदेशातून ‘हरमन 99’ या वाणाची 150 रोपे आणून त्याची एक एकरात 12 फूट बाय 8 फूट या अंतराने लागवड केली. कडक उन्हामुळे यातील 25 रोपे काही दिवसातच मरून गेली, पण योग्य ती काळजी घेतल्यानंतर यातील 125 रोपे जगली. मूळातच या भागात पाणी कमी असल्याने ठिबकच्या माध्यमातूनच त्यांनी या रोपांना पाणी आणि काही आवश्यक खतांचे डोस दिले. तसेच शेणखताचाही वेळोवेळी वापर केला. लागवड केलेल्या दुसर्‍याच वर्षी आज या बागेतील एका-एका झाडाला साधारणत: 30 ते 40 सफरचंद लागली आहेत. एकेका सफरचंदाचे वजन 100, 150 ते 200 ग्रॅम इतके आहे. सध्या सफरचंदाचा प्रचलित बाजारभाव सरासरी 200 रुपयांच्या घरात आहे. त्या हिशेबाने एकेका झाडापासून त्यांना 600 ते 1600 रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. संपूर्ण बागेतील 125 झाडांचा विचार करता यंदा यातून त्यांना 75 हजार ते 2 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे.

सावंत यांच्या बागेतील सफरचंदामध्ये आणि हिमाचल प्रदेशातून येणार्‍या सफरचंदामध्ये काहीही फरक दिसून येत नाही. लालभडक रंग, फळाची गोडी आणि वाससुद्धा एकसारखाच आहे. सावंत यांच्या या अभिनव प्रयोगामुळे जम्मू-काश्मिरप्रमाणेच आता सावंत यांच्या भोंड्या माळावरही सफरचंदाची बाग डौलाने डोलू लागली आहे. जिद्द आणि चिकाटीला अभ्यासाची जोड दिली तर जतसारख्या खडकातूनही सोने पिकवता येते, हे सावंत या शेतकर्‍याने दाखवून दिले आहे.

यापूर्वी दुष्काळी जत तालुक्यातील शेतकर्‍यांना सफरचंदाचे झाड कसे असते हे देखील माहीत नाही परंतु सावंत यांनी दोन वर्षांपूर्वी लागवड केलेल्या सफरचंदाची बाग आज बहरली आहे, ही बाग बघायला दूरवरून लोक येऊ लागले आहेत. कृषि विभागाचे अधिकारीही या बागेला भेट देऊन या सफरचंद लागवडीची माहिती घेऊ लागले आहेत. त्याचप्रमाणे सावंत यांच्यापासून प्रेरणा घेऊन या भागातील अन्य काही शेतकर्‍यांनीही सफरचंदाची लागवड करायची सुरुवात केली आहे.

सावंत आणि त्यांचे कुटुंबिय अनेक वर्षांपासून शेतीमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करत आहेत. त्यांनी शेतात आंबा, पेरू, लिंबू, चिकू, चिंच, सीताफळ, आवळा, डाळिंब व नारळ या फळपिकांची जोपासना केली आहे. विविध फळझाडांची कलमे ते स्वतः तयार करतात. सावंत यांनी आजपर्यंत आपल्या शेतीमध्ये केलेले वेगवेगळे यशस्वी प्रयोग विचारात घेवून राज्य शासनाने त्यांना यापूर्वीच ‘उद्यान पंडित’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

सफरचंदाच्या लागवडीपासून 2 वर्षानंतर झाडास फळे येण्यास सुरुवात होते. साधारण बहार आल्यानंतर 130 ते 140 दिवसांपर्यंत फळे काढणीस परिपूर्ण पक्व तयार होतात. एका चांगल्या पद्धतीने जोपासलेल्या झाडापासून साधारणत: 10 ते 12 किलो फळे प्रति वर्षी उपलब्ध होतात. डिसेंबरमध्ये सफरचंदाची पानगळ होते. जानेवारीत झाडाला फळधारणा होते. जूनपर्यंत फळांचा रंग हा पांढरा असतो, त्यानंतर फळ लाल होते. पुढील दोन ते तीन महिन्यात त्याची काढणी करून विक्री केली जाते.

दुष्काळी भागात सफरचंदाची शेती यशस्वी होऊ शकते, हे सिद्ध करून दाखविले आहे. भविष्यात लागवड वाढविणार आहे, तसेच दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना हे पीक घेण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे. इतर पिकापेक्षा सफरचंदाच्या लागवडीत खर्च कमी उत्पन्न जास्त मिळण्याची शक्यता वाटते. शासन ड्रॅगन फ्रुटला अनुदान देत आहे, तसेच सफरचंद लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने अनुदान देण्याची गरज आहे.
– काकासाहेब सावंत, अंतराळ

Back to top button