सांगली : लग्नाच्या आमिषाने गंडा घालणारी नववधू जेरबंद | पुढारी

सांगली : लग्नाच्या आमिषाने गंडा घालणारी नववधू जेरबंद

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : बिरणवाडी (ता. तासगाव) येथील तरुणाकडून लग्नासाठी 1 लाख 60 हजार रुपये घेऊन पलायन करणार्‍या वधूला इस्लामपूर पोलिसांनी कुंजिरवाडी (ता. हवेली, जि. पुणे) येथून अटक केली आहे. अर्चना मास्तर सावंत (वय 23, रा. वाघोली, पुणे) असे संशयित महिलेचे नाव आहे. न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयित अर्चना, तिची एजंट मैत्रीण ज्योती धनंजय लोंढे (वय 38, रा. वाघोली) आणि त्यांच्या टोळीने लग्नाच्या आमिषाने तरुणांना हजारो रुपयांचा गंडा घातला आहे. या टोळीतील दोघींविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.

नोव्हेंबर महिन्यात बिरणवाडी येथील तरुणाशी अर्चनाचे लग्न झाले होते. त्यासाठी 1 लाख 60 हजार रुपयांची रक्कम टोळीने उकळली होती. अर्चनाने 13 दिवसांच्या संसारानंतर माहेरी जाऊन येतो, असे म्हणून तिने पलायन केले होते. त्यानंतर तिने मैत्रिण आजारी असल्याचे सांगून ऑनलाईन त्या तरुणाकडून पैसे मागून घेतले. त्यानंतर तिने दाजी आजारी असून 1 लाख रुपये पाठविण्यास सांगितले. अर्चना हिची मैत्रीण ज्योती लोंढे हिने तरुणाला फोन करून, ‘1 लाख रुपये पाठवा, नाहीतर अर्चनाला पाठवून देणार नाही’, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. त्यामुळे तरुणाला त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्याने अर्चना, ज्योती मध्यस्थी बेबीजान शेख यांच्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान, इस्लामपूर, रेड येथील तरुणांना अर्चना, ज्योती आणि त्यांच्या टोळीने अशाच प्रकारे लग्नाच्या आमिषाने गंडा घातल्याचे तपासात समोर आले.

इस्लामपूरचे पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शरद बावडेकर आणि त्यांच्या पथकाने कुंजिरवाडी येथून अर्चना सावंत हिला अटक केली. मंगळवारी न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी अर्चनाची मैत्रीण एजंट ज्योती हिला अटक केली असून ती न्यायालयीन कोठडीत आहे. या टोळीचे आणखी कारनामे उघड होण्याची शक्यता आहे.

Back to top button