सांगली : देशाला महासत्ता बनवण्यासाठी ग्रामव्यवस्था मजबूत करा; भास्करराव पेरे पाटील | पुढारी

सांगली : देशाला महासत्ता बनवण्यासाठी ग्रामव्यवस्था मजबूत करा; भास्करराव पेरे पाटील

जत; पुढारी वृत्तसेवा : देशाला महासत्ता बनवण्यासाठी ग्राम व्यवस्था मजबूत करणे गरजेचे आहे. शंभर वर्षांचे आरोग्य मिळण्यासाठी स्वच्छ हवा, पाणी आणि चांगले अन्न मिळाले पाहिजे. योग्य नेतृत्व मिळाले तर समाजात सकारात्मक बदल घडतो, सरपंचांनी आपले अधिकार वापरताना योग्य आर्थिक नियोजन करून सेवावृत्तीने काम केले पाहिजे, असे मत आदर्श गाव पाटोदाचे शिल्पकार तथा माजी सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी व्यक्त केले. आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त अचकनहळ्ळी ग्रामपंचायतच्या वतीने तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी पेरे-पाटील हे बोलत होते.

भास्कर पेरे-पाटील म्हणाले, सरपंचांनी राजकारण न करता गावाचा विकास व कल्याणासाठी आर्थिक नियोजन करावे. नव नवीन कल्पनांना साकारतांना जनतेचा सहभाग घ्यावा. गावात पाणी, शिक्षण ,य आरोग्य व आवश्यक गरजांच्या पुर्तेतेसाठी काम केल्यास निश्चितच ग्रामोन्नती होईल. सरपंचांनी आपले अधिकार वापरताना सेवावृत्तीने काम केले पाहिजे. काळ आणि प्रसंग बघून निर्णय घेतले पाहिजेत. केवळ लोकांना बरे वाटेल असे निर्णय न घेता, काही धाडसी निर्णय घेऊन गावाला शिस्त लावली पाहिजे. गावात प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर मार्ग काढताना लोकप्रतिनिधींना शासनाच्या योजना, कायदे आणि नियम यांची जाण असावी, याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. गाव पातळीवरील लोकप्रतिनिधींनी काय करावे? आणि काय करू नये? हे त्यांना माहीत असेल तर ते उत्तम काम करू शकतील.

पेरे पाटील म्हणाले, देश महासत्ता करणेसाठी गावे स्वच्छ समृद्ध आणि स्वयंपूर्ण केले पाहिजे. आर्थिक नियोजन बारकाईने करावे. नागरिकांना उत्तम सुविधा झाली तर नागरिक कर द्यायला मागे राहत नाही हे आम्ही आमच्या पाटोदा गावी सिद्ध केले आहे. गावात आज एवढे उपक्रम राबवले जातात कि ते लक्षात ठेवणे देखील कठीण आहे. पाटोदा गावच्या ग्रामपंचायतीची स्थापना १९९५ ला झाली. त्यावेळी गावची लोकसंख्या २८५० होती. आज ती ३५०० च्या आसपास आहे. गावात पूर्वी अनेक समस्या होत्या. इतर गावाप्रमाणे पाटोद्यात देखील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती, ना स्मशानभूमी होती ना गावात चांगले रस्ते होते. गावाचे त्यावेळी करामधून मिळणारे उत्पन्न फक्त १ लाख होते. ते देखील लोकं भरत नसत. आज टॅक्सच्या स्वरूपात वार्षिक ४० लाख रुपये येतात. टॅक्स भरणाऱ्या लोकांना काही सुविधा मोफत दिल्या तर ते वेळेवर टॅक्स भरतील. यासाठी गावात १ लाख रुपये खर्चून अगोदर एक पिठाची गिरणी सुरु केली. यातून टॅक्स भरणाऱ्यांना मोफत दळण देण्याचं ठरवलं. गावातील महिलांनी ओळखले की दळनाला हजार रुपये देण्यापेक्षा टॅक्स भरलेला चांगला. गावात आज २४ तास शुद्ध पाणी पुरवठा केला जातो. पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून मीटर जोडलेले आहेत. गावात आज ४२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. प्रत्येक घरासमोर झाड, कचराकुंडी आहे. कोणालाही सहज हात धुता येतील असे प्रत्येक गल्लीत बेसिन्स बसवलेले आहेत. गावच्या स्मशानभूमीत तर जांभळाची असंख्य झाडं लावलेली आहेत. तिथे गेल्यावर ती स्मशानभूमी आहे का गार्डन असा प्रश्न पडतो.

आमदार विक्रमसिंह म्हणाले, सर्व नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी गावकर्‍यांच्या विश्‍वासाला तडा जाऊ न देता गावात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवाव्यात व गावचा सर्वांगीण विकास साधावा. ते म्हणाले, मी आमदार झाल्यापासून तालुका झपाट्याने प्रगती करीत आहे. म्हैसाळच्या योजनेबरोबरच कर्नाटकातून पूर्व भागाला पाणी मिळावे यासाठी सतत प्रयत्नशील आहे. विधानसभेत आवाज उठविल्यानंतर विस्तारित योजनेला निधी मिळाला. प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोहचेपर्यंत मI स्वस्त बसणार नाही. ‘जलजीवन मिशन’ च्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी आणला आहे. भारताला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करावा लागेल. गावाच्या विकासासाठी ठोस काम करायची इच्छा असेल तर काहीही अशक्य नाही.

यावेळी, माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, संजय सावंत, नगरसेवक भपेंद्र कांबळे, सरपंच सुनंदा अनिल कोळी,उपसरपंच महादेवी बंडू कोळी, सदस्य समाधान शिंदे, प्रकाश कोळी, प्रशांत कांबळे, श्रीशैल कुंभार, सदस्या वैशाली कोळी, सरसाबाई सोनुरे, विमल शिंदे, धानेश्वरी कोरे , ग्रामसेवक दादासाहेब चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button