सांगली : राजकीय नेत्याचा लाल मातीवर डल्ला | पुढारी

सांगली : राजकीय नेत्याचा लाल मातीवर डल्ला

सांगली : पुढारी वृत्तसेवा :  येथील आयर्विन पुलाला पर्यायी पूल उभा करण्यासाठी सुरू असलेल्या कामावरील लाल माती सांगलीतील एका राजकीय नेत्याने रातोरात पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही माती त्याने स्वतःच्या फार्महाऊसवर नेली असल्याची चर्चा आहे..

सध्या पुलाचे गतीने काम सुरू आहे. या पुलाचे काम करण्यासाठी आलेल्या कामगारांमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. या नेत्याने मोठ्या प्रमाणात माती नेली आहे. कृष्णा नदीकाठी लाल माती आहे. पुलाचे काम करताना उत्खनन करण्यात आले होते. त्यावेळी निघालेल्या मातीचे ढिगारे तिथेच ठेवण्यात आले आहेत. या राजकीय नेत्याने गेल्या चार दिवसात डंपर लावून ही माती रातोरात लंपास केली. रातोरात त्याने हा सारा पराक्रम केला आहे.

जिल्हा प्रशासनापर्यंत याची माहिती गेली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या एक-दोन दिवसात चौकशी लागण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून पंचनामा होऊन शहर पोलिस ठाण्यात या राजकीय नेत्याविरूद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. माती चोरीचे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाच्याठिकाणी खास रखवालदारांची नियुक्ती केली आहे.

Back to top button