सांगलीच्या दुष्काळी भागात वाहतेय ‘पाताळगंगा’ | पुढारी

सांगलीच्या दुष्काळी भागात वाहतेय 'पाताळगंगा'

सांगली : पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्याचा मिरज पूर्व भाग हा तसा पाहिला तर एक दुष्काळी टापू. अगदी अलीकडे या भागात म्हैसाळ योजनेचे पाणी आल्याने काही प्रमाणात बागायत झाली आहे; अन्यथा काही वर्षांपूर्वीपर्यंत टँकरच्या पाण्यावर या भागाची तहान भागत होती. मात्र, याच भागात मिरज सलगरे रस्त्यावर बेळंकी गावानजीक असलेल्या एका टेकडीवर आणि भोंड्या माळरानावर शेकडो वर्षांपासून एक वाहता झरा किंवा तीन-चार फुटांचे पाण्याचे एक छोटेसे डबके आहे. त्यातील पाणी कितीही उपसले तरी कमी होत नाही.

एवढेच नव्हे, तर कितीही मोठा दुष्काळ पडला; तरी या झऱ्यातील पाणी तसूभरही कमी होत नाही. चारी बाजूंना कोरडाठाक भोंडा माळ पसरलेला असताना मध्येच असलेला हा झरा पाहणा-याला आश्चर्यचकित केल्याशिवाय राहत नाही. स्थानिक नागरिक या झऱ्याचा उगम थेट पाताळातून झाल्याचे मानतात आणि म्हणूनच या परिसरातील जुन्याजाणत्या लोकांकडून या झऱ्याला दुष्काळी भागातील ‘पाताळगंगा’ म्हटले जाते.

Back to top button