सांगली : कृष्णा प्रदूषणच्या विळख्यात | पुढारी

सांगली : कृष्णा प्रदूषणच्या विळख्यात

बोरगाव; विजय शिंदे :  सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून वहात येणारी कृष्णा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. नदीतील जलचर पाण्यातील प्राणवायू संपुष्टात येत असल्याने मृत्युमुखी पडत आहेत. दोन दिवसांपूर्वी हजारो माशांचा तवंग नदीपात्रात आढळला.

वाळवा तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीतून नदीकाठी असलेल्या अनेक गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. कृष्णा नदीमध्ये नदीकाठच्या अनेक गावांचे सांडपाणी सोडण्यात येते. तसेच औद्योगिक वसाहत व अन्य कारखान्यातून बाहेर पडणारे रासायनिक सांडपाणी त्यात मिसळते. यावर उतारा म्हणून कोयना धरणातून पाणी सोडले जाते. या सोडलेल्या पाण्याबरोबर नदीतील प्रदूषित पाणी वाहून जाण्याची प्रक्रिया केली जाते. यामुळे धरणातील पाणी वाया जाते. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून काहीच कारवाई केली जात नाही. केवळ नोटिसा देण्याची औपचारिकता पार पाडली जाते. त्यामुळे पाणी पिण्यास अयोग्य आहे, पण विविध जलजन्य आजारांना आमंत्रित करणारे ठरत आहे.

जलचरांचे अस्तित्व धोक्यात…

कृष्णा नदीमध्ये नदीकाठच्या गावातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडण्यात येते. याचा परिणाम म्हणून जलचराचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कारखान्यातून बाहेर टाकले जाणारे पाणी रसायनयुक्त असते. तसेच सांडपाण्यामुळे पाण्यातील सजिवांना आवश्यक असलेले खाद्यांचा नाश होतो. तसेच प्राणवायूचेही विघटन झाल्याने व आवश्यक प्राणवायूच उपलब्ध होत नसल्याने मासे मृत्युमुखी पडण्याचे प्रकार घडत आहे.

Back to top button