सांगली : औदुंबरच्या डोहात मृत मगर आढळली | पुढारी

सांगली : औदुंबरच्या डोहात मृत मगर आढळली

पलूस; पुढारी वृत्तसेवा :औदुंबर डोहाच्या नैसर्गिक मुक्त अधिवासात दुपारच्यावेळी बर्‍याचदा मगरीचा मुक्त संचार पहायला मिळत असतो. मात्र याच डोहात एक मगर मृतावस्थेत तरंगत असताना आढळली. येथील नावाडी नितीन गुरव यांना ही मगर दिसताच त्यांनी भिलवडी पोलिस ठाण्यात तसेच वन विभागास माहिती दिली.

कडेगाव-पलूस वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सांगलीच्या उपवनसंरक्षक (प्रा) नीता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सहाय्यक वनसंरक्षक अजित साजणे, कडेगाव – पलूस वनपरीक्षेत्र अधिकारी पल्लवी चव्हाण , वनपाल मारुती ढेरे, वनरक्षक सुरेखा लोहार व इतर वन कर्मचार्‍यांनी मृत मगरीस बाहेर काढले. सांगलीचे मानद वन्यजीवरक्षक अजितकुमार पाटील यांच्या उपस्थितीत माळवाडीच्या पशुधन विकास अधिकारी सायली तगरे यांच्यामार्फत मगरीचे शवविच्छेदन करून दहन करण्यात आले.

मासेमारीच्या जाळ्यात अडकून मगरीचा मृत्यू झाल्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे. कोणताही वन्यप्राणी घरामध्ये अथवा आपल्या परिसरामध्ये आढळून आल्यास किंवा सापडल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ वनविभागास 1926 या टोल फ्री क्रमांकावर द्यावी, असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.

Back to top button