सांगली : वटवाघळांपासून द्राक्षे वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड | पुढारी

सांगली : वटवाघळांपासून द्राक्षे वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड

वाळवा; पुढारी वृत्तसेवा : वाळवा परिसरातील शेतकर्‍यांनी पक्षी आणि वटवाघळापासून द्राक्षे वाचवण्यासाठी बागेवर मासे पकडण्याची जाळी अंथरून बागा वाचविण्याची तयारी केली आहे.

वाळवा परिसरात सुमारे अडीच ते तीन हजार एकर क्षेत्रात द्राक्षपीक घेतले जाते. विशेषतः काळी द्राक्षे मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. या भागात आर्द्रता जास्त असल्यामुळेच काळी द्राक्षे चांगली येतात आणि त्यांना दरही चांगला मिळतो. यावर्षी अतिपाऊस आणि अवकाळी पाऊस यामुळे शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने बागा वाचविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली आहे. त्याबरोबरच पीक हाताला लागावे म्हणून लाखो रुपयांची कीटकनाशके, बुरशीनाशके व लागणारी खते घालून जिकीरीने द्राक्ष पीक वाढविले आहे.

द्राक्ष पीक तयार होत असतानाच रात्रीच्यावेळी वटवाघळे आणि दिवसा इतर पक्षी द्राक्षावर हल्ला करून नुकसान करत असतात. दिवसा काही पक्षी घडातील मणी फोडतात. तर रात्री वटवाघळे सारी बागच अक्षरशः साफ करतात. त्यामुळे शेतकर्‍यांनी वर्षभर केलेले कष्ट आणि लाखो रुपये वाया जातात. त्यापासून बागा वाचविण्यासाठी मासे पकडण्याची जाळी द्राक्षबागेवर पसरून रात्री बागेत फिरून गस्त घालत आहेत. अजून द्राक्षे तयार झालेली नाहीत. काही दिवसात मोठमोठे प्रखर प्रकाशाचे लाईट आणि फटाके वाजविण्याची तयारी करावी लागणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्षबागायतदार संघाचे संचालक चंद्रशेखर शेळके यांनी दिली. वटवाघळे द्राक्षबागांचे लाखो रुपयांचे नुकसान करतात. मात्र नुकसान भरपाई देण्याची शासनाची कोणतीही तरतूद नाही किंवा विमाही नाही. त्यामुळे दरवर्षी अनेक शेतकर्‍यांना लाखो रुपयांचा फटका बसतो, म्हणून मासे पकडण्याची जाळी वापरून बागा वाचवण्याची धडपड शेतकरी करत आहेत.

Back to top button