सांगली : दूधदर ऐंशीपार होण्याची चिन्हे! | पुढारी

सांगली : दूधदर ऐंशीपार होण्याची चिन्हे!

सांगली; मोहन यादव :  अलीकडच्या काही महिन्यांत दुधाच्या खरेदी-विक्री दरात सतत चढ-उतार होत आहेत. याचा फायदा शेतकर्‍यांऐवजी दूधसम्राटांना होताना दिसत आहे. तर ग्राहकांनाही दरवाढीचा मोठा फटका बसत आहे. तसेच लम्पीचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यातच पशुखाद्याची महागाई, चार्‍याची टंचाई यामुळे येत्या काही महिन्यांत दूध उत्पादनात घट होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे विक्री दर 70 ते 80 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. याचा फायदाही संघाच्या खिशात जाणार आहे.

देशातील सुमारे आठ कोटी कुटुंबांची रोजीरोटी या व्यवसायावर अवलंबून आहे. तर महाराष्ट्रात दररोज सुमारे दोन कोटी लिटर दूध दररोज संकलित होते. यापैकी संघटित क्षेत्रात प्रतिदिन अंदाजे एक कोटी 30 लाख लिटर दूध संकलित होते. यातील सुमारे 40 लाख लिटर दूध पॅकिंग करून घरगुती वापरासाठी वितरित केले जाते. पॅकिंगमधील हे 40 लाख लिटर व असंघटित क्षेत्रात वापरले जाणारे 70 लाख लिटर दूध वगळता तब्बल 90 लाख लिटर दूध उपपदार्थांसाठी जाते. या दुधाची पावडर बनविली जाते. महाराष्ट्रात मिल्क पावडर बनविण्याच्या क्षेत्रात खासगी कंपन्यांची मक्तेदारी आहे. त्यामुळे या कंपन्या दुधाचे खरेदी भाव वारंवार पाडतात. तसेच संघांकडूनही शेतकर्‍यांची वषार्ंनुवर्षे पिळवणूक सुरू आहे. फॅट, वजनात गोलमाल करून उत्पादकांची लूट सुरू आहे. शेतकर्‍यांकडून कमी भावाने खरेदी केलेल्या दुधातील फॅट काढून त्यांची पावडर व इतर उपपदार्थ बनवून संघ नफा कमवित आहेत.

पशुखाद्यांची सतत दरवाढ

दुधाचे दर हे सहा महिन्यांतून एकदा वाढतात तर पशुखाद्याच्या दरात महिन्याला वाढ होते. खुराक, कळणा, पेंड, हिरवा-वाळलेला चारा, इंधन यामध्ये सहा महिन्यांतून वाढ ठरलेलीच आहे. त्यामुळे दुधाच्या दरात वाढ झाली तरी शेतकर्‍यांच्या पदरात काहीच पडत नाही. दुधाच्या दरात 1 किंवा 2 रुपयांनी वाढ होते. मात्र, खाद्याच्या दरात दुपटीने वाढ होते. काही महिन्यांपूर्वी कळण्याचे 50 किलोचे पोते हे 600 वरून 1000 ते 1200-1500 पर्यंत गेले आहे. मक्यापासून बनवलेली कांडी ही 1000 हून 1400, तर सरकी पेंड 600 वरून 1500 वर, तर खपरी पेंडीचे दर काही महिन्यांपूर्वी 2200 वर होते, तेच आता 2700 च्या पुढे गेले आहेत. त्यामुळे मेहनत, खर्चाचा विचार करता दूध उत्पादन परवडत नाही. यातून उत्पादक कर्जबाजारी झाले आहेत.

दरवाढीचा ग्राहकांना फटका

नुकतीच सर्वच संघांनी दरवाढ केली आहे. पूर्वी म्हशीच्या 6 फॅट आणि 9 एसएनएफच्या प्रतिलिटर दुधाला 45.50 पैसे असा खरेदी दर होता. तो आता म्हशीच्या दुधाला 47.50 पैसे केला आहे. आधी गायीच्या 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफच्या प्रतिलिटर दुधाला 32 रुपये भाव मिळत होता. तो 35 रुपये झाला आहे. दुसरीकडे म्हशीच्या दूध विक्री दरातही 3 रुपयांची वाढ केली आहे. आधी म्हशीच्या एक लिटर दुधाचा दर 60 ते 62 रुपये होता. तो आता 63 ते 65 रुपये झाला आहे. तर अर्धा लिटर म्हशीच्या दुधाची किंमत 30 रुपयांवरून 32 ते 34 रुपये झाली आहे. मुंबई, पुण्यात एक लिटर म्हशीच्या दुधाची किंमत 66 रुपयांवरून आता 69 ते 70 रुपये झाली आहे. तर अर्धा लिटर म्हशीच्या दुधाची किंमत 33 रुपयांवर 35 रुपये झाली आहे. दही, ताक, लोणी, तूप, श्रीखंड, चक्का, लस्सी यासह अन्य उपपदार्थाच्या भावात ही संघांनी मनमानी वाढ केली आहे. कमी फॅटमुळे गायीच्या दुधाला फारशी मागणी नसते, त्यामुळे हे दूध म्हशीच्या दुधात मिसळले जाते. सध्या गायीच्या दुधाची विक्री प्रतिलिटर 50 ते 55 रुपयांनी सुरू आहे. त्यातच लम्पीचा संसर्ग वाढूच लागल्याने पुढील काही महिन्यांत दूध उत्पादनात घट होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे विक्री दर 70 ते 80 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र, यामुळे सामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.

भेसळीचा भस्मासूर

टोन्ड दूध बनविण्याच्या परवानगीचा गैरफायदा भेसळबहाद्दर घेत आहेत. दुधातील स्निग्धांश काढून घेऊन त्यात पावडर आणि पाणी मिसळून 3 फॅट व 8.5 एसएनएफचे ‘टोन्ड दूध’ बनविले जाते. तसेच 1.5 फॅट व 9 एसएनएफ गुणवत्तेचे ‘डबल टोन्ड’ व ‘स्कीम मिल्क’ बनविले जाते. पाणी व इतर घटकांमुळे कृत्रिमरीत्या दुधाचे उत्पादन वाढते. परिणामी मागणीच्या तुलनेत खरेदीदर कमी राहतात. याशिवाय अनेकदा केमिकल वापरून बनावट दुधाचीही निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. पाणी, पावडर, स्टार्च, साखर, ग्लुकोज, युरिया, मीठ, न्युट्रिलायजर, हायड्रोजन पेरॉक्साईड, डिटर्जंट यासारख्या घातक पदार्थांची दुधात भेसळ केली जाते. जनतेच्या आरोग्याशी व जीवाशी खेळ करून यातून मोठा नफा कमविला जातो. अशा कृत्रिम व भेसळीच्या दूध निर्मितीतून ‘अतिरिक्त’ उत्पादन वाढवूून खरेदीभाव पाडले जातात.

हे करण्याची गरज

  • उसाप्रमाणे दुधासाठी एफआरपी मिळावी. यासाठी दुग्धमूल्य आयोगाची स्थापना करावी.
  •  सदोष मिल्कोमिटरद्वारे होणारी दूध उत्पादकांची लूट थांबवावी.
  •  दूध, उपपदार्थांच्या नफ्यात शेतकर्‍यांना वाटा मिळावा.
  •  दूध व दुग्धपदार्थांची आयात बंद करून निर्यातीला प्रोत्साहन द्यावे.
  •  स्पर्धा रोखण्यासाठी ‘एक राज्य, एक ब्रँड’ धोरण राबवावे.
  •  भेसळविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी ग्राहकांना रास्त दरात गुणवत्तापूर्ण दूध मिळावे.
  • शासकीय मोफत पशुविमा धोरण राबवावे.
  • धान्याप्रमाणे दूध व उपपदार्थांचे रेशन व कल्याणकारी योजनांद्वारे गरिबांना स्वस्तात वितरण करावे.
  • दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती नेमून ग्राहकांना रास्त दरात दूध मिळावे.

दूध विक्रीबरोबरच उपपदार्थांच्या निर्मिती व विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. पेढा निर्मिती व विक्रीमध्ये प्रतिकिलो 75 रुपये (53 टक्के), दह्यात 17 रुपये (39 टक्के), श्रीखंडमध्ये 51 रुपये (57 टक्के), आम्रखंडमध्ये 65 रुपये (87 टक्के) नफा मिळतो. या नफ्यात शेतकर्‍यांना वाटा मिळावा यासाठी दूध क्षेत्राला रेव्हेन्यू शेअरिंचे तत्त्व लागू करण्याची गरज आहे.
– उमेश देशमुख, राज्य सचिव, किसान

Back to top button