सांगली : प्रकाशपर्वाला थाटात प्रारंभ .. लक्षलक्ष दिव्यांनी आसमंत उजळला | पुढारी

सांगली : प्रकाशपर्वाला थाटात प्रारंभ .. लक्षलक्ष दिव्यांनी आसमंत उजळला

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  तिमिरातून तेजाकडे नेणार्‍या, लक्षलक्ष दिव्यांनी घरेदारे आणि आसमंत उजळवून टाकणार्‍या दीपोत्सवास सांगली जिल्ह्यात अपार उत्साहात प्रारंभ झाला. दिवाळीच्या खरेदीसाठी धनत्रयोदशी दिवशी म्हणजे शनिवारी सायंकाळी जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठ्या बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने गजबजून गेल्या होत्या. विविध प्रकारचा फराळ, मिठाई, आकाशकंदील, फटाके, कपडे, सोन्या-चांदीचे दागिने अशा विविध वस्तूंची खरेदी झाली. रविवारी नरक चतुर्दशीच्या पूर्वसंध्येपर्यंत दिवाळीची आणखी खरेदी होणार आहे. दीपावलीमुळे सर्वत्र चैतन्यमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.

दीपावली म्हणजे प्रकाशाचा, तेजाचा उत्सव. दीपावली म्हणजे विविध प्रकारच्या खरेदीचा उत्सव, विविध प्रकारच्या फराळ आणि गोडधोड पदार्थांचा आस्वाद घेण्याचा उत्सव. त्यामुळे दीपावलीचा खर्‍या अर्थाने सर्वत्र उत्साह पाहायला मिळतो. यंदाच्या दीपोत्सवावर अवकाळी पाऊस आणि वाढत्या महागाईचे संकट आहे. मात्र, तरीही प्रत्येकजण आपापल्यापरीने हा उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे.
सांगलीसह जिल्ह्यातील रुग्णालयेे, औषध दुकानांत आरोग्यदेवता धन्वंतरीचे शनिवारी पूजन करण्यात आले. तसेच व्यापारी
आणि घरोघरी धनत्रयोदशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. व्यापार्‍यांनी वार्षिक ताळेबंदीच्या वहीचे पूजन केले. सायंकाळी सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.

घरात सुखशांती, समृद्धी आणणार्‍या दिवाळीच्या सणाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. शहरात ठिकठिकाणी गाईचे पूजन करून वसुबारस साजरी करण्यात आली होती. दिवाळीचा दुसर्‍या दिवशी धनयोत्रदशीचा साजरी केली जाते. दरवेळी प्रमाणे यंदा शनिवारी भगवान धन्वंतरी, भगवान कुबेर आणि लक्ष्मीचे पूजा करण्यात आली. धनत्रयोदशी निमित्त रुग्णालये, औषध दुकानामध्ये फुलांची सजावट करण्यात आली होती. आर्कषक रांगोळी काढण्यात आली होती. तसेच घरोघरी धनत्रयोदशी साजरी करण्यात आली. कुबेर आणि लक्ष्मीचे पूजन करून धन, सुख-समुद्ध येऊ दे, अशी प्रार्थना करण्यात आली.

दरम्यान, दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, कपडे, फराळाचे तयार पदार्थ खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे.

Back to top button