सांगली : हवेतील कणांचे प्रमाण 20 टक्क्यांनी घटवण्याचे उद्दिष्ट | पुढारी

सांगली : हवेतील कणांचे प्रमाण 20 टक्क्यांनी घटवण्याचे उद्दिष्ट

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  हवेतील कणांमुळे प्रदूषण वाढत आहे. सन 2024 पर्यंत हवेतील कणांचे प्रमाण 20 टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक आहे. मोठ्या गृहप्रकल्पांनी 25 ते 30 टक्के हरितपट्टा स्वरूपात सोडावे, याकडे महापालिकेतील कार्यशाळेत लक्ष वेधण्यात आले.

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेत कार्यशाळा घेण्यात आली. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचे नोडल ऑफिसर डॉ. रवींद्र ताटे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी नवनाथ औताडे, फिल्ड ऑफिसर गजानन खडकीकर, महापालिकेचे पर्यावरण अभियंता अजित गुजराथी, क्रेडाई अध्यक्ष रवींद्र खिलारे, सुनील कोकितकर, जयराज सगरे, आनंदराव माळी, इमरान मुल्ला, तात्यासाहेब खोत, सुनील माणकापुरे, विनय भट, प्रदीप जामदार उपस्थित होते.

सन 2024 पर्यंत पीएम 10 आणि पीएम 2.5 पॅरामीटर्स कमी करण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारकडून स्वच्छ हवा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सन 2024 पर्यंत वातावरणातील खडबडीत आणि सूक्ष्म कणांचे प्रमाण किमान 20 टक्क्यांनी कमी करण्याचे प्रमुख उद्दिष्ट असलेला हा कार्यक्रम प्रदूषण नियंत्रणाचा उपक्रम आहे.

मोठ्या गृहप्रकल्पांनी 25 ते 30 टक्के क्षेत्र हे लॉन, गार्डन, टेरेस गार्डन स्वरुपात हरित पट्टा म्हणून सोडले पाहिजे. झाकलेल्या वाहनांमध्ये बांधकाम साहित्याची वाहतूक, बांधकाम साहित्य रस्त्याच्या कडेला ठेवण्यावर निर्बंध, महापालिकेकडून नियमित तपासणी, बांधकाम राडारोडा नियम, बांधकाम उपक्रमांसाठी धूळ नियंत्रण उपायांचा विकास, पायाभूत सुविधा निर्माण करणे, कार्बन फूटप्रिंट रिडक्शन, नेट झिरो कमिटमेंट्स आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या उपक्रमात समाजसेवी संस्था, नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात
आले.

Back to top button