स्थायी राहणार भाजपकडेच; निरंजन आवटी होणार सभापती | पुढारी

स्थायी राहणार भाजपकडेच; निरंजन आवटी होणार सभापती

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. 9) मतदान होणार आहे. स्थायी समिती सभापतिपद भाजपकडेच राहणार आणि निरंजन आवटी हेच सभापती होणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपकडून निरंजन आवटी व ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीकडून फिरोज पठाण (काँग्रेस) यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

सभापती निवडणुकीसाठी स्थायी समितीची विशेष सभा गुरुवारी सकाळी 11.30 वाजता ऑनलाईन सुरू होणार आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये भाजपचे बहुमत आहे. भाजपकडे 9, काँग्रेसकडे 4 आणि राष्ट्रवादीकडे 3 सदस्य आहेत. भाजपमध्ये सभापतिपदाच्या उमेदवारीसाठी आवटी आणि सविता मदने यांच्यात मोठी रस्सीखेच सुरू होती. राजकीय ताकदीच्या जोरावर अखेर आवटी यांनी बाजी मारल्याची चर्चा आहे. मंगळवारी रात्री 11 वाजता भाजपचे प्रदेशाध्यक्ष

चंद्रकांत पाटील यांच्याकडून सभापतीपदाच्या उमेदवारीसाठी आवटी यांचे नाव आले आणि बुधवारी सकाळी 11 वाजता भाजपतर्फे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला.

आवटी यांनी महापालिकेत नगरसचिव चंद्रकांत आडके यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे महापालिकेतील गटनेते विनायक सिंहासने, अ‍ॅड. स्वाती शिंदे, युवराज बावडेकर, सुब्राव मद्रासी, राजेंद्र कुंभार, गीता सुतार, गीतांजली ढोपे-पाटील, संगीता खोत, संजय कुलकर्णी, गणेश माळी उपस्थित होते.

काँग्रेसकडून सभापतीपदाच्या उमेदवारीसाठी फिरोज पठाण व करण जामदार इच्छुक होते. मात्र अपेक्षित जुळणी झाली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात उत्साह नव्हता. काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांनी फिरोज पठाण यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले. पठाण यांनी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उमेदवारी अर्ज दाखल केला.

उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर (काँग्रेस), राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, नगरसेवक संजय मेंढे, संतोष पाटील, करण जामदार, नर्गिस सय्यद, अमर निंबाळकर, मनगू सरगर,अभिजीत हारगे, रविंद्र वळवडे उपस्थित होते.

भाजपमधील फाटाफुटीवर काँग्रेसची जुळणी अवलंबून होती. मात्र फाटाफुटीपूर्वीच भाजपने सर्व 9 नगरसेवकांना सहलीवर पाठवत एकसंघ ठेवले. त्यामुळे काँग्रेसच्या जुळणीला मर्यादा आल्या. भाजपनेही आवटी यांची उमेदवारी जाहीर करून काँग्रेसच्या गोटातील उरलीसुरली आशाही संपुष्टात आणली असे मानले जाते.

‘टॉस’वर आले तरी चालेल…! उमेदवाराची धडपड

स्थायी समितीत भाजपचे संख्याबळ 9, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे संख्याबळ 7 आहे. भाजपमधील एक सदस्य गळाला लागला तरी ‘टॉस’वर नशीब आजमावण्याची तयारी काँग्रेसच्या गोटात असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याद़ृष्टीने प्रयत्न सुरू होते. उमेदवाराकडून हस्ते-परहस्ते ऑफर सुरू होत्या, असे सूत्रांनी सांगितले. भाजपने मात्र सर्व 9 सदस्य एकसंघ असून भाजपचे आवटी हेच सभापती होणार, असा ठाम विश्वास व्यक्त केला.

Back to top button