सांगली : राज्यात दहा लाखांवर बेकायदेशीर खाद्यान्न विक्रेते! | पुढारी

सांगली : राज्यात दहा लाखांवर बेकायदेशीर खाद्यान्न विक्रेते!

सांगली; सुनील कदम : राज्यात जवळपास दहा लाखांहून अधिक बेकायदेशीर खाद्यान्न विक्रेते असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या खाद्यान्न विक्रेत्यांकडे अन्न-औषध प्रशासनाचा कसलाही परवाना किंवा कुठे कसलीही नोंद नाही. हा प्रकार म्हणजे राज्यातील जनतेच्या आरोग्याशी मांडलेला जीवघेणा खेळ आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

पाच वर्षांपूर्वी म्हणजे 2017 मध्ये राज्यातील खाद्यान्न विक्रेत्यांची मोजदाद करण्यात आली होती. त्यावेळी त्यांची संख्या होती 16 लाख 86 हजार. विशेष म्हणजे, या 16 लाख 86 हजार खाद्यान्न विक्रेत्यांपैकी केवळ 56 टक्के म्हणजे जवळपास आठ लाख खाद्यान्न विक्रेत्यांकडे अन्नऔषध प्रशासनाचा परवाना होता. गेल्या पाच वर्षांत बेरोजगारांच्या संख्येत झालेली वाढ व वाढलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत राज्यातील खाद्यान्न विक्रेत्यांची संख्या किमान वीस ते बावीस लाखांवर गेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. खाद्यान्न विक्रेत्यांकडे असलेले अन्न-औषधच्या परवान्यांचे प्रमाण विचारात घेता आजघडीला राज्यात किमान दहा लाखांहून अधिक बेकायदेशीर खाद्यान्न विक्रेते कार्यरत आहेत, असे म्हणायला वाव आहे.

आजकाल खाद्यान्नातील भेसळीमुळे होणार्‍या आजारांचे असंख्य प्रकार निदर्शनास येऊ लागले आहेत. पिठीसाखर आणि हळदीत मिसळण्यात येणार्‍या खडू पावडरमुळे पोटाचे आणि मूत्राशयाचे गंभीर आजार होण्याचा धोका संभवतो. पिठीसाखरेत, दुधात आणि बनावट आईस्क्रीममध्ये मिसळण्यात येणार्‍या डिटर्जंट पावडर आणि सोड्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आतड्याचे गंभीर आजार उद्भवत असल्याचे निदर्शनास आले आहे. खाद्यतेलात मिसळण्यात येणार्‍या अन्य तेलांमुळे शरीरात अतिरिक्त चरबी वाढून रक्तदाब, मधुमेह आणि स्थूलता येऊ शकते. लाल मिरची पावडरमध्ये मिसळण्यात येणार्‍या विटांच्या भुकटीमुळे किडन्यांना घातक इजा होऊ शकते. डाळी रंगविण्यासाठी वापरण्यात येणार्‍या रंगांमुळे अनेक प्रकारचे त्वचारोग उद्भवू शकतात. आईस्क्रीममधील डालड्याच्या वापरामुळे हृदयरोगाची भीती कित्येक पटीने वाढते. त्याचप्रमाणे सॅकरीनमुळे मधुमेहाला निमंत्रण ठरलेलेच आहे. कॅल्शियम कार्बाईडच्या वापरामुळे कॅन्सरचा धोका वाढतो आहे. खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करण्यासाठी जे जे म्हणून घटक वापरण्यात येतात, ते सगळेच्या सगळे मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज राज्यात उद्भवत असलेल्या एकूण आजारांपैकी जवळपास पंधरा ते वीस टक्के आजार हे अन्नपदार्थांमधील आणि खाद्यपेयांमधील भेसळीमुळे होत असल्याचे आढळून आले आहे. राज्यात दरवर्षी जवळपास पन्नास हजारहून अधिक लोकांचा मृत्यू हा केवळ खाद्यान्नातील भेसळीमुळे होताना दिसतो. अगदी लहान वयापासून ते प्रौढांपर्यंत आढळून येत असलेले श्वसनाचे विकार, मधुमेह, कॅन्सर, वेगवेगळे त्वचारोग, स्थूलता, पोटाचे विकार, मेंदूविकार, आतड्याचे विकार आदी बहुतांश विकार हे केवळ खाद्यान्नामधील भेसळीमुळे होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याबाबतीत आता सर्वांनीच सर्व पातळीवर खबरदारी घेण्याची वेळ आलेली आहे. खाद्यान्नातील भेसळ म्हणजे भेसळसम्राटांनी राज्यातील जनतेच्या आरोग्याशी मांडलेला जीवघेणा खेळ आहे. भेसळीतील स्लो पॉयझनिंगच्या माध्यमातून होत असलेल्या या मानवी हत्या आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

राज्यातील जनतेच्या आरोग्याच्या बाबतीत बेकायदेशीर खाद्यान्न विक्रेत्यांनी आणि खाद्यान्नातील भेसळीने खेळ मांडलेला असतानाही राज्यातील अन्न-औषध प्रशासन हातावर हात ठेवू निवांत असल्याचे दिसत आहे. उलट राज्यातील लाखो बेकायदेशीर खाद्यान्न विक्रेत्यांना आणि भेसळासुरांना अन्न-औषध प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण अभय’ असल्याचे दिसून येत आहे. महिन्याला मिळणार्‍या ‘बिदागीपोटी’ अन्न-औषध प्रशासन संबंधितांवर कारवाया करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचा सर्वसामान्यांचा आरोप आहे. राज्यातील बेकायदेशीर खाद्यान्न विक्रेत्यांचे प्रमाण आणि खाद्यान्नातील भेसळीचा जनतेवर होत असलेला भयावह परिणाम विचारात घेता आता याबाबतीत एखादी राज्यव्यापी मोहीम सुरू करण्याची गरज आहे. अन्न-औषध प्रशासनातील त्रुटी विचारात घेता पोलिस आणि आरोग्य विभागाच्या मदतीने राज्यातील भेसळीच्या गोरखधंद्याला कायदेशीर अटकाव करण्याची आवश्यकता आहे.

Back to top button