जत : कन्नड शाळेतील विद्यार्थ्यांना सुगम भारती पाठ्यपुस्तक मिळालेच नाही | पुढारी

जत : कन्नड शाळेतील विद्यार्थ्यांना सुगम भारती पाठ्यपुस्तक मिळालेच नाही

जत ; विजय रूपनूर : जत तालुक्यात शिक्षण विभागासमोर अनेक समस्यांचा डोंगर आ वासून उभा आहे. जिल्ह्यातील सर्वात जास्त प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे २७६ इतकी जत तालुक्यातील आहेत. त्यात भौतिक सुविधांचा अभाव मोठ्या प्रमाणात आहे. धोकादायक वर्ग खोल्यामुळे विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शाळेत बसत आहेत. आता अशातच कन्नड माध्यमाच्या ३५ प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत सुगम भारती (हिंदी) व मराठी पाठ्यपुस्तकापासून वंचित आहेत. शासनाची पहिली ते आठवी पर्यंत मोफत पाठ्यपुस्तक देण्याची तरतूद आहे. मात्र विद्यार्थ्यांना सुगम भारती (हिंदी) व मराठी पाठ्यपुस्तक देण्याऐवजी मराठी सुलभभारती हे पुस्‍तक देण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर त्‍याचा परिणाम होत आहे. याबाबत पालकांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिक्षण विभाग याकडे लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

शिक्षण विभागातील प्रथम सत्र कालावधी (सहा महिन्याचा) संपत आला. तरीही सध्या (हिंदी) सुगम भारतीचे पुस्तक विद्यार्थ्यांना मिळालेच नाही. यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यासाठी, गृहपाठ करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. याबाबत संबंधित प्राथमिक शाळेने शिक्षण विभागाकडे मागणी करून देखील दुर्लक्ष केले जात आहे. ही वस्तुस्थिती आहे. शासनाच्या मोफत व सक्तीच्या अधिनियमानचा भंग होत असल्याचे दिसून येते. मुळातच कन्नड माध्यमाची हिंदी व मराठी पाठ्यपुस्तक हे शासन मोफत देत असल्याने बाजारात विक्रीस उपलब्ध नाहीत. परिणामी पालकांना ही पुस्तके बाजारात कुठेही मिळेना झाली आहेत.

दरम्यान, शिक्षण विभागाला सुगम भारती (हिंदी) या विषयाऐवजी मराठी सुलभ भारती हे पुस्तक सुरुवातीला देण्यात आले होते. सदरचे पुस्तक शिक्षकांनी हिंदी व इंग्रजी माध्यमासाठी असल्याचे स्पष्ट करत पुस्तक पंचायत समितीला परत केले होते. तदनंतर पंचायत समितीने कन्नड माध्यमाच्या शाळेसाठी सुगम भारती (हिंदी) व मराठी पुस्तके लवकरात लवकर मागवून घेऊन विद्यार्थ्यांना देऊ असे सांगितले होते. परंतु चार महिन्याच्या कालावधीनंतरही तीच परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. ही गंभीर बाब मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या गोष्‍टीत लक्ष घालण्याची पालकांनी मागणी केली आहे.

सुरुवातीच्या कालावधीमध्ये पंचायत समितीकडे हिंदी, कन्नड माध्यमातून असणारे सुगम भारती हे पुस्तक नव्हते. आम्ही याबाबत संबंधित शाळांना यापूर्वीचे विद्यार्थ्यांना दिलेली पुस्तके जमा करून घेऊन तीच चालू वर्षातील विद्यार्थ्यांना द्यावीत अशा सूचना देण्यात आल्‍या आहेत. कोणत्याही शाळेत (हिंदी) सुगम भारती चे पुस्तक मिळाले नसल्यास त्यांनी पंचायत समितीकडे संपर्क साधावा. त्यांना ती पुस्‍तके उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाईल.

-रतिलाल साळुंखे, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जत

सुगम भारती हिंदी व मराठी पुस्तक दुकानात मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करायला व गृहपाठ सोडवताना अडचणी येत आहेत. तरी लवकरात लवकर कन्नड माध्यमातील शाळांना (हिंदी) सुगम भारती व मराठी पुस्तक देण्यात यावे व विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी.

-काडाप्पा मुचंडी, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती जालीहाळ बुद्रुक (ता. जत)

Back to top button