सांगली : मांजर्डेत ओढ्याच्या पुरात एकाचा बुडून मृत्यू | पुढारी

सांगली : मांजर्डेत ओढ्याच्या पुरात एकाचा बुडून मृत्यू

मांजर्डे : पुढारी वृत्तसेवा मांजर्डे (ता. तासगाव) येथे कापूर ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेल्यामुळे विजय बाळकृष्ण जाधव (वय 50) यांचा मृत्यू झाला. सांगली येथील स्पेशल रेस्क्यू टीमला मृत्यूदेह शोधण्यात यश आले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी मध्यरात्री मांजर्डे, पेड या भागाला जोरदार पावसाने झोडपले. त्यामुळे कापूर ओढा दुथडी भरून वाहत होता. या ओढ्यावर मांजर्डे-हातनूर रस्त्यावर असणारा पूल पाण्याखाली गेला होता. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. विजय जाधव हे गुरुवारी सकाळी या रस्त्यावरून जवळच असणार्‍या यल्लमा मंदिराकडे चालले होते. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जोरात पाणी सुरू होते. पाण्याचा अंदाज आला नसल्यामुळे ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले. ग्रामस्थानी कापूर ओढा पात्रात शोधमोहीम सुरू केली. मात्र ते सापडले नाहीत.

त्यानंतर सांगली येथून मदतीसाठी स्पेशल रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. कैलाश वडर यांच्यासह अन्य रेस्क्यू टीम सदस्यांनी चार तास शोधमोहीम राबविली. अखेर सायंकाळी घटनास्थळापासून जवळच मृतदेह सापडला.

Back to top button