सांगली : जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे 7 रुग्ण | पुढारी

सांगली : जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे 7 रुग्ण

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे सात रुग्ण सापडले आहेत. यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच चौघांवर सध्या उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागातील सहा तर, विटा नगरपालिका क्षेत्रातील एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, कोणीही घाबरू नये, मात्र काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातील रायवाडी आणि पलूस तालुक्यातील बांबवडे, दुधोंडी येथील तिघांचा स्वाईन फ्लूची लागण होऊन मृत्यू झाला आहे. तसेच तासगाव तालुक्यातील सावळज, खरसुंडी (ता. आटपाडी) आणि जत तालक्यातील रावळगुंडवाडी येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. या रुग्णांवर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 30 जणांवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. तसेच आरोग्य विभागामार्फत त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली आहे.

स्वाईन फ्लू सदृश्य रुग्णांची लक्षणे

स्वाईन फ्लूची लागण झाल्यास सुरुवातीला ताप, घसादुखी, खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी ही लक्षणे असतात. बालरुग्णांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरुपाचा ताप येतो, घसादुखी असणार्‍या बाळामध्ये तोंडातून अतिप्रमाणात लाळ गळते, काहीजणांना जुलाब, उलट्या होतात. तसेच धाप लागणे, श्वास घेताना छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, ताप न उतरणे अशी लक्षणे आढळ्यास तसेच लहान मुलांमध्ये चिडचिड वाढल्यास, खाण्यास नकार देत असल्यास, उलटी होत असल्यास तातडीने डॉक्टरांकडे जावून तपासणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

स्वाईन फ्लूवर वेळेत उपचार झाल्यास रुग्णांच्या जीवाला धोका कमी असतो. त्यामुळे लोकांनी घाबरू नये. मात्र काळजी घेणे गरजेचे आहे. लक्षणे जाणवल्यास तातडीने शासकीय रुग्णालयात जावून तपासणी करून घ्यावी. – डॉ. दिलीप माने
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सांगली

 

Back to top button