सांगली : कोयनेत आवक 16 हजार तर जावक 15 हजार | पुढारी

सांगली : कोयनेत आवक 16 हजार तर जावक 15 हजार

सांगली : पुढारी वृत्तसेवा धरण पाणलोट क्षेत्रात सध्या मध्यम प्रमाणात पाऊस पडत आहे. कोयना धरणात रविवारी 16 हजार 541 क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. तर याच धरणातून 15 हजार 871 क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 16.9 फुटावर स्थिर होती.

सांगलीसह जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. हवेत गारवा होता. अधूनमधून किरकोळ पावसाच्या सरी कोसळत होत्या. काही भागात मध्यम पाऊस झाला. धरणात पाण्याची आवक अद्यापही सुरूच आहे. कोयना धरणात 16 हजार 541 क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. तसेच चांदोलीत 3 हजार 492, धोम 2 हजार 611, कण्हेर 2 हजार 694 तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणात 90 हजार 914 क्युसेकने पाण्याची आवक होत आहे.

कोयना धरणातून शनिवारी 32 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. रविवारी सकाळी हा विसर्ग 31 हजार 639 करण्यात आला होता. मात्र सायंकाळी हा विसर्ग 15 हजार 871 करण्यात आला होता. धरणातून विसर्ग वाढल्याने कृष्णा नदीची पाणी पातळी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र शनिवारी सायंकाळी सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची 16 फूट 9 इंच असणारी पातळी रविवारी स्थिर होती. कृष्णा नदीची शनिवारी सायंकाळी विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची पातळी व कंसात इशारा पातळी फुटामध्ये अशी ः कृष्णा पूल कराड 14.8 (45), आयर्विन पूल सांगली-16.9 (40) व अंकली पूल हरिपूर-20 (45.11).

Back to top button