लवकरच चांदोली धरण १०० टक्के भरणार; विसर्ग झाला कमी | पुढारी

लवकरच चांदोली धरण १०० टक्के भरणार; विसर्ग झाला कमी

वारणावती; आष्पाक आत्तार : चांदोली धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाची हजेरी आहे. दररोज तीन ते चार हजार क्युसेक प्रति सेकंद दराने पाण्याची आवक होत आहे. सध्या धरण 90.68 टक्के भरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास केवळ तीन टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे धरण 100 टक्के भरण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

चांदोली परिसरात आजअखेर 2242 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच तारखेअखेर (20 ऑगस्ट) 2479 मिलिमीटर पाऊस पडला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 237 मिलिमीटर पाऊस कमी आहे. पाऊस कमी असला तरी धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत जवळपास सारखाच आहे. गतवर्षी आजच्या तारखेला धरण 90.97 टक्के भरले होते. तर यंदा हीच टक्केवारी 90.68 टक्के आहे.

यंदा पावसाने उशिरा सुरुवात केली. पाच जुलै रोजी 85 मिलिमीटर पाऊस होऊन यंदाच्या पावसात पहिली अतिवृष्टी नोंदवली गेली. तिथून पुढे सलग आठ-दहा दिवस अतिवृष्टी झाली. त्यामुळे धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली. परिणामी धरणाचे चारही दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला होता.

चांदोली धरणातून विसर्ग झाला कमी

चांदोली धरण क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. धरणाच्या सांडव्यातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग पूर्ण बंद करण्यात आला. त्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्रात गेले आहे. गेल्या दहा दिवसांपासून पाण्यात असणार्‍या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करावे, अशी मागणी होत आहे. दहा दिवसांपूर्वी वारणा नदीचे पाणी पोट मळीतून शिरले होते. पावसाचा जोर वाढेल तसे धरण प्रशासनाने वारणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवला होता. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात पात्राबाहेर होते.

Back to top button