सांगली जिल्ह्यात १०१ जण झाले फौजदार! | पुढारी

सांगली जिल्ह्यात १०१ जण झाले फौजदार!

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा पोलिस दलातील 101 सहायक पोलिस निरीक्षकांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सव वर्षाची अनोखी भेट देऊन त्यांना फौजदारपदी (उपनिरीक्षक) पदोन्नती देण्यात आली आहे. जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी रविवारी पदोन्नतीचे आदेश काढले.

सहायक पोलिस उपनिरीक्षकांची 30 वर्षे सेवा पूर्ण झाली आहे. तसेच ज्यांना हे पद मिळाल्यापासून तीन वर्षे सेवा झाली आहे, अशा 101 सहाय्यक उपनिरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती मिळालेल्या सांगली शहर पोलिस ठाणे, विश्रामबाग, मिरजेतील गांधी चौक, पोलिस मुख्यालय, कोकरूड, जिल्हा विशेष शाखा, इस्लामपूर, नियंत्रण कक्ष, कुपवाड एमआयडीसी, मोटार परिवहन विभाग, पलूस, सांगली, मिरजेतील वाहतूक नियंत्रण शाखा, संजयनगर, चिंचणी-वांगी, बिनतारी संदेश, कुरळप, बॉम्बशोधक पथक, जत, उमदी,विटा, दहशतवाद विरोधी पथक, सांगली ग्रामीण, चिंचणी वांगी,कुंडल व कासेगाव पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षकांचा समावेश आहे. पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी नूतन 101 उपनिरीक्षकांचे अभिनंदन केले.

नूतन पोलिस उपनिरीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली होणार का, त्यांना जिल्ह्यातच नियुक्त केले जाणार, याबाबत माहिती मिळू शकली नाही.

खात्यांतर्गत परीक्षेनंतर उपनिरीक्षकाची लॉटरी!

पोलिस उपनिरीक्षक होण्यासाठी यापूर्वी खात्यांतर्गत परीक्षा द्यावी लागत आहे. जिल्हा पोलिस दलातील अनेक पोलिस यापूर्वी परीक्षा देऊन उपनिरीक्षक झाले आहेत. पण स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त 101 जणांना अनोखी भेट देऊन थेट उपनिरीक्षकपदी पदोन्नती दिली आहे.

Back to top button