विटा : फसवणूक झालेल्या १५ द्राक्ष बागायतदारांचे ४७ लाख मिळाले परत | पुढारी

विटा : फसवणूक झालेल्या १५ द्राक्ष बागायतदारांचे ४७ लाख मिळाले परत

विटा : पुढारी वृत्तसेवा: खानापूर तालुक्यातील फसवणूक झालेल्या १५ द्राक्ष बागायतदारांची ४७ लाखांहून अधिक रक्कम विटा पोलिसांनी परत केली. ही फसवणूक नगर जिल्ह्यातील गणेश सुधाकर बारस्कर (वय ३४, रा. मिरपुर लोहारे, ता. संगमनेर) आणि प्रवीण नारायण फटांगरे (वय ३२ वर्षे, रा. खडकवाडी, ता. पारनेर) यांनी एक्सपोर्ट कंपनीचे मालक असल्याचे सांगून केली होती. याप्रकरणी दोघांनाही अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यातील गणेश बारस्कर आणि प्रवीण फटांगरे या दोघांनी खानापूर तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांना आमच्याकडे तुमच्या द्राक्षाचा माल घाला, चांगला दर देतो, असे सांगितले होते. त्यानुसार तालुक्यातील चिखलहोळ, माहुली देविखिंडी, चिंचणी आणि विटा परिसरातील एकूण १५ द्राक्ष बागायतदारांनी ४ फेब्रुवारी ते १० फेब्रुवाfरी २०२१ या दरम्यान आपल्या बागांमधील निर्यातक्षम द्राक्षे गणेश बारस्कर याच्या गणेश ट्रेडींग कॉर्पोरेशन आणि प्रवीण फटांगरे याच्या शाईन अँड राइज एक्सपोर्ट कंपनी लि. औंध (पुणे) या दोन कंपन्यांना दिली. मात्र, या दोघांनी संगनमताने द्राक्षे खरेदी करुन ती परस्पर एक्सपोर्ट केली. आणि विक्री करून संबंधित द्राक्ष बागायदार शेतकऱ्यांना याचे पैसे दिले नव्हते.

गेल्या वर्षभरापासून ते दोघेही परागंदा झाले होते. यादरम्यान येथील यासंदर्भातील सर्व शेतकऱ्यांनी गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेळोवेळी या दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते सापडले नाहीत. अखेरीस तालुक्यातील चिखलहोळ येथील धनाजी शामराव यमगर यांच्यासह अन्य १४ द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी यावर्षी ४ जानेवारी रोजी विटा पोलीस ठाण्यामध्ये गणेश बारस्कर आणि प्रवीण फटांगरे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती. यात एकूण १५ जणांची ४७ लाख ५ हजार ८५० रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार विटाचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत होते.

गुन्हा दाखल झाल्यापासूनच्या महिन्यातच सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण खाडे यांना गोपनीय खबऱ्यामार्फत काही टिप्स मिळाल्या. त्यानंतर तांत्रिकदृष्टया तपास करुन यातील दोन्ही संशयित आरोपींचा पुणे आणि मुंबई येथे शोध घेतला. यातील गणेश बारस्कर यास २२ जानेवारीरोजी अटक करण्यात आली होती.

बारस्कर याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याला पोलीस कोठीडी सुनावण्यात आली.  त्याच्याकडे सखोल चौकशी असता त्याने १२ द्राक्ष बागायतदारांचे एकूण ३२ लाख ५ हजार ८५० रुपये परस्पर त्यांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याचे स्पष्ट झाले. तर संशयित प्रवीण फटांगरे यास गेल्याच महिन्यात २४ जुलै रोजी विटा पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून एकूण १५ लाख रुपये रोख रक्कम वसूल करण्यात आली. या प्रकरणातील संबंधित द्राक्ष बागायतदारांना न्यायालयाच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्यामध्ये बोलावून साक्षीदारांच्या समोर एकूण ४७ लाख ५ हजार ८५० रुपये रोख रक्कम परत करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button