सांगली : 98.38 कोटींची एफआरपी थकीत; सात कारखान्यांकडे येणे | पुढारी

सांगली : 98.38 कोटींची एफआरपी थकीत; सात कारखान्यांकडे येणे

सांगली; विवेक दाभोळे : सन 2021-2022 च्या गळीत हंगामातील जिल्ह्यात सात कारखान्यांकडे अद्याप 98 कोटी 38 लाख रुपयांची एफआरपी लटकली आहे. वेळेत एफआरपी अदा झाली नाहीतर या सहा बड्या साखर कारखान्यांचा आगामी हंगामासाठीचा गाळप परवाना मिळण्याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. मात्र जिल्ह्यातील अन्य सहा कारखान्यांनी संपूर्ण एफआरपी दिलेली आहे.

सांगली जिल्ह्यात गेल्या (21-22) गळीत हंगामात 17 सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांपैकी 12 कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला होता. यातील बहुसंख्य कारखान्यांनी पहिली उचल 2500 ते 2650 रुपयांपर्यंत प्रतिटन पहिली उचल दिली. यातून आजअखेर शेतकर्‍यांना 7 हजार 327 कोटी 61 लाख 97 हजार रुपये मिळाले आहेत. मात्र हंगामात पाच कारखाने बंद होते. आता हंगाम संपून साडेचार पाच महिने होत आहेत. आता तर सन 2022-2023 चा गळीत हंगाम तोंडावर आला आहे. याचदरम्यान, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ज्या कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही त्यांचा सन 2022-2023 च्या गळीत हंगामासाठीचा गाळप परवाना रोखून धरण्याचा इशारा दिला आहे.

या पार्श्‍वभूमीवर ज्या कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही त्यांना गाळप परवाना मिळणार की नाही, की त्याआधी हे साखर कारखाने उर्वरित एफआरपी देणार की कसे याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागून आहे. खरे तर गाळप उसाचे चार महिन्यानंतरही संपूर्ण पैसे मिळालेले नाहीत. यामुळे ऊसउत्पादकांचे अर्थकारण उद्ध्वस्त झाले आहे.

याच दरम्यान, साखर कारखान्यांनी आता नवीन हंगामासाठी यंत्रणा सज्ज करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र याचदरम्यान, ऊसउत्पादक शेतीकामांसाठी उसनवार करून खर्च करत आहेत. आता आडसाली लागणीचा हंगाम आहे. मात्र हाताशी पैसा नसल्याने शेतकरी कोंडीत सापडला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सहकारी तसेच खासगी साखर कारखान्यांमध्ये सन 2021-2022 च्या हंगामात झालेले उसाचे गाळप, सरासरी साखर उतारा, एक ऑगस्ट 2022 अखेरची थकीत एफआरपी याची माहिती वरील चौकटीत दिली आहे.

कोरोना, नंतरचा महापूर यामुळे ऊसउत्पादकांची अवस्था आधीच बिकट झाली आहे. अनेकांकडे रोजच्या चरितार्थासाठी पैसे नाहीत.कारखानदारांनी वेळेत उसाचे बिल दिले असते तर त्यांना दिलासा मिळाला असता. मात्र तसे न करता त्यांच्या ऊसबिलाचे पैसे अडवून ठेवले आहेत. या कारखानदारांनी किमान आता तरी शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काचे पैसे द्यावेत. ज्या कारखान्यांनी पहिल्या दणक्यातच संपूर्ण एफआरपी दिली त्यांचे अभिनंदन! ज्या कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही, त्यांच्याकडून शेतकर्‍यांच्या हक्काचा आणि घामाचा पै आणि पै वसूल केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. प्रसंगी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यावर उतरू.
– महेश खराडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

संपूर्ण एफआरपी दिलेले कारखाने

 • जत, दत्त इंडिया,
 • मोहनराव (आरग),
 • निनाई, सद‍्गुरू
 • श्री श्री, उद्गिरी

थकीत एफआरपी असणारे कारखाने

 • हुतात्मा,
 • साखराळे,
 • वाटेगाव,
 • कारंदवाडी,
 • सोनहिरा,
 • विश्‍वास,
 • क्रांती

Sugar Factory FRP

एफआरपी होती

 • पहिल्या दहा टक्के साखर उतार्‍यासाठी 2900 रु. आणि त्यापुढील प्रत्येक एक टक्का साखर उतार्‍यासाठी 290 रु. (तोडणी – वाहतूक खर्चासह) प्रतिटन

Back to top button