सांगली जिल्हा बँक : जुन्या नोटांचे ११२ कोटी सहा वर्षांपासून पडून | पुढारी

सांगली जिल्हा बँक : जुन्या नोटांचे ११२ कोटी सहा वर्षांपासून पडून

सांगली; शशिकांत शिंदे : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सहा वर्षांपूर्वी 1 हजार आणि 500 रुपयांच्या नोटावर अचनाक बंदी जाहीर केली. त्यानंतर ठराविक मुदतीमध्ये बँकांना त्यांच्याकडील जुन्या नोटा जमा करण्यास सांगण्यात आले होते. त्यातील सांगलीसह राज्यातील आठ जिल्हा बँकांतील 112 कोटी 4 लाख रुपये स्वीकारण्यास आरबीआयने नकार दिला. त्यामुळे ही रक्कम गेली 6 वर्षापासून बँकेत पडून आहे.

दरम्यान, केंद्र सरकार, आरबीआय विरोधात सांगलीसह राज्यातील पुणे, वर्धा, नागपूर, अहमदनगर, कोल्हापूर आणि नाशिक या बँकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे. शुक्रवारी अंतिम निकाल लागण्याची शक्यता असून त्यामध्ये काय निर्णय होणार याकडे सांगलीसह या 8 बँकांचे पदाधिकारी, कर्मचारी यांचे लक्ष लागले आहे. यामध्ये सांगली जिल्हा मध्यवर्तीचे 14 कोटी 72 लाख रुपये अडकलेे आहेत.

केंद्र सरकारने लागू केलेल्या नोटाबंदीनंतर देशातील 371 जिल्हा बँकांत 4 दिवसात 44 हजार कोटींची रक्कम जमा झाली. एकट्या महाराष्ट्रात 31 जिल्हा बँकांत 4600 कोटी जमा झाले होते. यात जुन्या चलनातली रक्कम देशात 8 हजार कोटी तर राज्यात 2772 कोटी रुपये होती.

8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 व 1000 च्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. त्यानंतर 10 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या 5 दिवसात जिल्हा बँकांमध्ये, तर 30 डिसेंबर 2016 पर्यंत पोस्ट ऑफिस आणि अन्य बँकांमध्ये जमा करण्यात आलेल्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही कार्यालयात स्वीकारल्या जातील, असे अर्थ मंत्रालयाने आदेशात म्हटले होते.

मात्र प्रत्यक्षात आरबीआयने नोटा स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर या बँकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर 2 हजार 771 कोटी रुपये स्वीकारण्यात आले. मात्र आठ बँकांचे 112 कोटी 4 लाख स्वीकारले नाहीत. त्यामुळे या आठ बँकांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता शुक्रवारी अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. आठपैकी बहुतेक जिल्हा बँका या अडचणीत आहेत. त्यांना तातडीने पैशाची गरज आहे. पैसे पडून असल्याने बँकेला फटका बसत आहे.

ईडीसह तीन संस्थांकडून तपासणी

सांगली जिल्हा बँकेत शिल्लक असलेल्या जुन्या नोटांबाबत ईडी, नाबार्ड आणि आयकर विभाग या तीन संस्थांनी कसून तपासणी केली आहे. रक्कम जमा करणार्‍या सभासदांची केवायसीही घेण्यात आली. मात्र या संस्थांना कोणतीही उणीव सापडली नाही.

नोटांना वाळवी लागण्याची वेळ

जिल्हा बँकेत तब्बल 14 कोटी 72 लाख रुपयांच्या 500 व 1000 च्या जुन्या नोटा धूळखात पडून आहेत. या नोटांना वाळवी आणि बुरशी लागू नये म्हणून त्या वारंवार मोजून ठेवाव्या लागत आहेत. त्याशिवाय पंख्याचे वारे देऊन जपून ठेवण्याची वेळ बँकेवर आली आहे.

जिल्हा बँकेत शिल्लक असलेली जुन्या नोटांची रक्कम ही सर्व सामान्य सभासदांची आहे. तीन संस्थांकडून तपासणी होऊनही त्यामध्ये काही आढळले नाही. त्यामुळे शुक्रवारी होणार्‍या सुनावणीत त्या स्वीकारण्याबाबत आदेश होईल, याची आम्हाला आशा आहे.
-आ. मानसिंगराव नाईक

Back to top button