मिरज : तानंग येथील कंपनीला 34 लाखांचा गंडा | पुढारी

मिरज : तानंग येथील कंपनीला 34 लाखांचा गंडा

कुपवाड; पुढारी वृत्तसेवा : तानंग (ता. मिरज) येथील ‘बायव्हेल कन्फेक्शनर प्रा. लि.’ या कंपनीचा तत्कालीन व्यवस्थापक दिनेश सुभाष पाटील (रा. पिंपळखेडा, जळगाव) याने दि. 6 नोव्हेंबर 2020 ते 3 मार्च 2022 या कालावधीत कंपनीतील 34 लाख 7 हजार 32 रुपयांच्या विविध साहित्याची परस्पर विक्री करून कंपनीची फसवणूक केली. याबाबत कंपनीचे व्यवस्थापक दिनेश नलवडे यांनी मंगळवारी रात्री उशिरा कुपवाड पोलिसात तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : तानंग (ता. मिरज) येथील ‘बायव्हेल कन्फेक्शनर प्रा.लि’ या कंपनीत संशयित दिनेश पाटील हा व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. पाटील याने कामावर असताना कंपनीतील चॉकलेट, लॉलीपॉप, स्क्रॅप, वेस्टेज माल असा एकूण 28 लाख 91 हजार 442 रुपयांचा माल तसेच दि.11 डिसेंबर 2020 ते दि. 16 फेब्रुवारी 2022 या कालावधीत कंपनीतील पुठ्ठा, चॉकलेटचे रॅपर, लोखंडी तसेच प्लास्टिकचे बॅरेल व इतर वस्तू असे 5 लाख 15 हजार 590 रुपयांचा माल असे एकूण 34 लाख 7 हजार 32 रुपयांच्या विविध साहित्याची परस्पर विक्री केली. कंपनीची फसवणूक करून संशयित दिनेश पाटील हा फरार झाला आहे. त्याच्या विरोधात कुपवाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Back to top button