जत : पासष्ट वर्गखोल्या धोकादायक | पुढारी

जत : पासष्ट वर्गखोल्या धोकादायक

जत; विजय रूपनूर : जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये भौतिक सुविधांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील 436 शाळेतील 65 वर्गखोल्या धोकादायक बनल्या आहेत. अंकलगी, रामपूर, सोरडी या ठिकाणी शाळा सुरू असताना छताचे प्लास्टर कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने सोरडी येथील विद्यार्थी वाचले होते. प्रशासनाने धोकादायक वर्गखोल्यांची दुरुस्ती अथवा आवश्यक ठिकाणी नवीन वर्गखोल्या बांधण्याची मागणी होत आहे.

तालुक्यात निर्लेंखनासाठी 13 प्रस्ताव प्रस्तावित करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद शाळा सनमडी, सोन्याळ येथील विवेकानंद वस्ती या शाळेचा निर्लेंखन प्रस्ताव मंजूर झाला आहे. तालुक्यात मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांची संख्या 65 पेक्षा अधिक आहे. काही शाळांनी धोकादायक वर्ग खोल्या असूनही प्रस्ताव सादर केले नाहीत. पावसाळ्यात वर्गखोल्या गळत आहेत. शाळेचे छतावरील सिमेंट काँक्रीटचे ढपले पडत आहेत. परिणामी विद्यार्थी जीव मुठीत धरून विद्यार्जन करत आहेत. अनेक शाळा मूल्यांकनास पात्रदेखील नाहीत कारण या शाळेचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीचे झाले आहे. मर्यादेपेक्षा कमी कालावधीत वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. परिणामी शाळेचे मूल्यांकन, निर्लंखन करता येत नाही. शिक्षण विभागासह बांधकाम विभागाची उदासीनता यास कारणीभूत ठरत आहे. अनेक जिल्हा परिषद शाळेस संरक्षण भिंत, स्वच्छतागृहे, शौचालय, पिण्याचे पाणी, मध्यान्ह शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी किचन शेड यासह भौतिक सुविधांची कमतरता आहे.

जिल्हा परिषदेने कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांसाठी हॅन्ड वॉश स्टेशन बसवले. मात्र, निकृष्ट दर्जाची ही युनिट आता विनावापर पडून आहेत. शालेय व्यवस्थापन समित्या कागदावरच राहिल्या आहेत. सन 2008 मध्ये सर्व शिक्षा अभियानांतर्गत तालुक्यात षटकोनी वर्गखोल्या बांधल्या आहेत. या वर्गखोल्या गळक्या व धोकादायक बनल्या आहेत. निर्लेखनाचे काम ग्रामपंचायत ते पंचायत समिती प्रशासन व बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम व कोल्हापूर अधीक्षक अभियंता यांच्याकडे मंजुरीसाठी जावे लागते.

धोकादायक व मोडकळीस आलेल्या वर्गखोल्याचा अहवाल संबंधित विभागाकडे दिलेला आहे. काही प्रस्ताव निर्लेंखनास सादर केले आहेत. धोकादायक वर्ग खोल्यामुळे कोणतेही नुकसान होऊ नये याची काळजी शिक्षण विभाग घेत असल्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी रतिलाल साळुंखे यांनी स्पष्ट केले.

यासाठी पालक व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची मागणी येळवीतील शालेय व्यवस्थापन समिती सदस्य लिंबाजी सोलनकर यांनी केली. ते म्हणाले, पालकांनी आपल्या परिसरातील धोकादायक असणार्‍या वर्गखोल्याबाबत ग्रामपंचायताकडे पाठपुरावा करावा. शालेय व्यवस्थापन समितीनेदेखील पाठपुरावा करण्याची गरज आहे.

Back to top button