तृणधान्ये तेजीत; मात्र फटका उत्पादकांना ! | पुढारी

तृणधान्ये तेजीत; मात्र फटका उत्पादकांना !

सांगली; विवेक दाभोळे : तूर व अन्य डाळींचे दर सामान्यांच्या आवाक्यात राहत नाहीत. मात्र यातून कडधान्य उत्पादकांना पैसाच पैसा मिळू शकतो असे चित्र उभे केले जात आहे. प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. अस्थिर हवामानाचा फटका बसून अनेक ठिकाणी उत्पादन खर्चदेखील निघत नाही. कडधान्ये पिकविणे जोखमीचे, बेभरवशाचे झाले आहे. सरकारने कडधान्य उत्पादकांसाठी असे धोरण निश्‍चित करण्याची गरज आहे.

काही महिन्यांपासून खास करून तूर डाळीचे दर महागडे राहिले आहेत. हरभरासह अन्य डाळींचे दर चढेच आहेत. यामुळे तूर, उडीद, चवाळा आदी कडधान्याची पिके घेणार्‍या शेतकर्‍यांना मोठाच फायदा होत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. मात्र लहरी हवामान, बेभरवशाचा पाऊस यामुळे मुळात कडधान्यासाठी अपवाद वगळता शेतकरी धजत नाही.

त्याचप्रमाणे ‘क्रॉप पॅटर्न’ मधील बदल अंगलट येतो. धाडसाने जरी कडधान्य पीक घेतले तरी त्यातून उत्पादन खर्च निघेल एवढे उत्पादन आणि उत्पन्न मिळत नाही. सध्या तुरीचा हमीभाव प्रतिक्विंटल दर 6600 रु. आहे. एक क्विंटल तुरीपासून साधारण 65 ते 70 किलो डाळ तयार होते. मात्र डाळ विक्रीचा दर आणि तुरीचा दर यातील फरकाचा फायदा हा तूरउत्पादक शेतकर्‍यांना (प्रारंभीचा काळ वगळता) मिळत नाही. अन्यवेळी हा फायदा कोठे जातो याचा सरकारनेच आता विचार करावा, अशी मागणी होत आहे. याचप्रमाणे उडीद, चवाळा, मूग आदी डाळींसाठीचे देखील चित्र आहे.

सरकारने जी. एम. तुरीला परवानगी द्यावी

प्रतिकूल हवामान आणि किडींचा प्रादुर्भाव यामुळे तुरीचे उत्पादन कमी होऊ लागले आहे. हंगामात पहिल्या टप्प्यात बाजारात जाणार्‍या तुरीला चांगला दर मिळतो, नंतर आवक वाढेल त्या प्रमाणात दरात घसरण होते. उत्पादन कमी असून देखील दर कमी मिळत असल्याचे चित्र आहे. या स्थितीत शेतकर्‍याला चांगले पैसे मिळवून देईल आणि ग्राहकांना देखील किफायतशीर दरात डाळ मिळेल यासाठी जी. एम. बियाणे चांगला पर्याय ठरू शकतात. यासाठी सरकारने विनाविलंब तुरीच्या जी. एम. बियाणांच्या वापरास परवानगी देण्याची गरज आहे.

– संजय कोले, नेते, शेतकरी संघटना

दरात मोठी वाढ पण उत्पादन घटले

कडधान्याच्या दरात आता मोठीच तेजी आली आहे. मात्र एकरी उत्पादन मात्र झटले आहे. आज तुरीचा दर 6600 रु. प्रतिक्विंटल आहे. सन 1995 मध्ये साधारणपणे तुरीचा प्रतिक्विंटल दर 1500 रुपये होता. सन 2016 मध्ये हा दर 8500 रुपये झाला आहे. 1995 मध्ये तूरडाळीचा प्रतिकिलोचा दर 20 रुपयांच्या घरात होता, आज हाच दर 95 रुपये झाला आहे. अर्थात दर जरी मोठ्या प्रमाणात वाढले असले तरी त्याचे उत्पादन तर घटले आहेच, शिवाय हंगामात दर मिळत नसल्याचे शेतकरी देखील कडधान्यांसाठी खूष राहत नसल्याचे चित्र आहे.

Back to top button