जत : वाहनचालकाचा संशयास्पद मृत्यू | पुढारी

जत : वाहनचालकाचा संशयास्पद मृत्यू

जत; पुढारी वृत्तसेवा : जाडरबोबलाद (ता. जत) येथील एका खासगी वाहनचालकाचा चेहरा विद्रुप आणि मारहाण केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. श्रीशैल निलाप्पा सायगाव (वय 47) असे संबंधित व्यक्‍तीचे नाव आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी उमदी पोलिस ठाण्यात अज्ञात कारणावरून मयत अशी नोंद करण्यात आली आहे.

घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांनी भेट देऊन कसून तपास करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने याबाबत अधिक माहिती मिळते का, हे तपासण्यास सुरुवात केली आहे.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, श्रीशैल सायगाव हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतो. तो राहण्यास गावातच होता. पंधरा वर्षांपासून पत्नी व दोन मुले यांच्याशी पटत नसल्याने तो विभक्त होता. त्यांच्या पत्नी माहेरी राहावयास आहेत.

दरम्यान, सोमवारी सकाळी श्रीशैलचा मृतदेह जाडरबोबलाद – मारोळी रस्त्यालगतच्या पाणंद रस्त्यात टाकण्यात आला आहे, अशी माहिती उमदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार यांना मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. यावेळी मृतदेहाजवळ रक्ताने माखलेली कपड्याची पिशवी मिळून आली. मृताचा चेहरा पूर्णपणे विद्रूप करण्यात आला आहे. श्रीशैलचा कान पूर्णपणे कापून टाकण्यात आला आहे. ही घटना रविवारी रात्री दहा ते बारा वाजण्याच्या सुमारास घडली असावी, असा अंदाज पोलिसांचा आहे. तोंड डोके ठेचण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. परंतु शस्त्र किंवा इतर हत्याराचा वापर झाला नसावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. यामुळे सायगाव यांचा मृत्यू कशाने झाला याचे गुढ वाढले आहे.

उमदी पोलिस ठाण्यात अज्ञात कारणावरून मयत अशी नोंद करण्यात आहे. याबाबत चनाप्पा सायगाव यांनी वर्दी दिली आहे.

Back to top button