मिरज : सावकारी प्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा | पुढारी

मिरज : सावकारी प्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा

मिरज; पुढारी वृत्तसेवा : शिंदेवाडी (ता. मिरज) येथील शेतकर्‍याला तिघा सावकारांनी व्याजाने दिलेल्या आठ लाख रुपयांच्या बदल्यात 16 लाख रुपयांची वसुली केली. तसेच अजून मूळ मुद्दल येणेबाकी असल्याचे सांगून जमीन नावावर करून देण्यासाठी शेतकरी कुटुंबाला धमकी देण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी शेतकरी नारायण अंकुश पाटील (वय 28, रा. विजापूर रोड, करलमळा, शिंदेवाडी) यांनी तिघाविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद आहे.

रोहित राजेंद्र शिंदे (रा. आरग), युवराज श्रीकांत पाटील (रा. अथणी) आणि संदीप सुबराव पाटील (रा. शिंदेवाडी) असे संशयित सावकारांची नावे आहेत.

नारायण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सावकारांकडून वेळावेळी व्याजाने पैसे घेतले होते. सावकार रोहित शिंदे यांच्याकडून सात टक्के व्याजाने तीन लाख 20 हजार, युवराज पाटील याच्याकडून 10 ते 15 टक्के व्याजाने एक लाख 80 हजार रुपये आणि संदीप पाटील याच्याकडून सात टक्के व्याजाने तीन लाख रुपये घेतले होते. या बदल्यात शिंदे याला सात लाख रुपये, युवराज पाटील याला सहा लाख 95 हजार रुपये आणि संदीप पाटील याला एक लाख 98 हजार रुपये व्याजासह परत केले होते. तरीही नारायण पाटील यांनी घेतलेल्या व्याजाचे पैशांतील मूळ मुद्दल येणेबाकी असल्याचे सांगत तिघा सावकारांनी वसुलीसाठी तागादा लावला होता.

पाटील यांच्या शिंदेवाडी गावातील घरात येऊन संपूर्ण कुटुंबियांना शिवीगाळ केली. तसेच पैशांच्या बदल्यात जमीन नावावर करून देण्यासाठी धमकी देण्यात आली. याबाबत ग्रामीण पोलिसात नोंद आहे.

Back to top button