सांगली : अंत्यविधी साहित्य ठेका रद्द; फेरनिविदा मागवल्या | पुढारी

सांगली : अंत्यविधी साहित्य ठेका रद्द; फेरनिविदा मागवल्या

सांगली : पुढारी वृत्तसेवा

अंत्यविधी साहित्य पुरवठ्याचा नवीन ठेका वर्कऑर्डर देण्यापूर्वीच रद्द करण्यात आला आहे. अंत्यविधी साहित्य पुरवठ्यासाठी महापालिकेने फेरनिविदा मागवल्या आहेत. दरम्यान, जुन्या ठेकेदाराकडून शुक्रवार सायंकाळपर्यंतच साहित्य पुरवठा होणार आहे. त्यामुळे फेरनिविदेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पर्यायी व्यवस्थेबाबत काय तोडगा निघणार, याकडे लक्ष लागले आहे.

ठेक्याची मुदत दि. 31 मार्च 2022 रोजी संपलेली आहे. मुदत संपलेल्या ठेकेदाराकडून तोंडी आदेशावर साहित्य पुरवठा केला जात होता. दरम्यानच्या कालावधीत नवीन ठेका निश्‍चितीसाठी निविदा मागवल्या. मात्र मागील ठेक्याच्या दरापेक्षा जादा दराची निविदा आल्याने नवीन ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली नाही. जुन्या ठेकेदाराने दर परवडत नसल्याचे कारण देत साहित्य पुरवठा करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे अंत्यविधी साहित्य उपलब्ध होण्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे.

दरातील तफावत विलंबास कारण

अंत्यविधी साहित्य पुरवठ्याच्या दि. 31 मार्च 2022 पर्यंतच्या ठेक्याचा दर 1 हजार 900 रुपये होता. मात्र नवीन निविदा मागवल्यानंतर सर्वात कमी दराची निविदा 2 हजार 960 रुपये दराची आहे. जुन्या व नवीन दरात 1 हजार 60 रुपये इतका फरक आहे. नवीन निविदेचा दर मागील निविदेपेक्षा सुमारे 36 टक्के जादा आहे. त्यामुळे साहित्य पुरवठ्यासाठी वर्कऑर्डर दिली नाही. जुन्या ठेकेदारालाच तोंडी आदेशाने साहित्य पुरवठा करण्यास सांगितले. मात्र जुन्या ठेकेदाराने जुना दर परवडत नसल्याचे सांगत साहित्य पुरवठा करण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे अंत्यविधी साहित्य पुरवठ्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

दरम्यान, आयुक्त नितीन कापडणीस यांनी जुन्या ठेकेदाराला बोलावून फेरनिविदा प्रक्रिया पूर्ण होऊन साहित्य पुरवठा होईपर्यंत साहित्य पुरवठा सुरू ठेवण्यास सांगितले आहे. मात्र जुन्या ठेकेदाराने दर परवडत नसल्याचे सांगत साहित्य पुरवठा करण्यास असमर्थता व्यक्त केली. दरम्यान, तोडगा निघेपर्यंत साहित्य पुरवठा करावा, असे आयुक्तांनी जुन्या ठेकेदाराला सांगितले आहे. त्यावर शुक्रवार सायंकाळपर्यंत साहित्य पुरवठा सुरू ठेवला जाईल, असे जुन्या ठेकेदाराने स्पष्ट केले आहे. त्यामुळे फेरनिविदेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत साहित्य पुरवठ्याच्या पर्यायी व्यवस्थेबाबत काय तोडगा निघणार, याकडे लक्ष लागले आहे.

पंपावरून डिझेल आणावे लागणार?

फेरनिविदेत अंत्यविधी साहित्य पुरवठ्यामध्ये लाकूड, डिझेल, कापड, सुतळी, बांबू काठ्या, बंधाट्या, शिकाळ्याचे साहित्य, दोन मडकी, झाकण, गुलाल, कापूर आदी साहित्यांचा समावेश आहे. तीन लिटर डिझेल संबंधित दोन पेट्रोलपंपावरून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना आणावे लागणार आहे. ते गैरसोयीचे ठरणार आहे. त्यामुळे त्याचा फेरविचार करावा, अशी मागणी होत आहे.

Back to top button