सांगली : सीआयडीने रजिस्टर माझ्यासमोर जप्त केले | पुढारी

सांगली : सीआयडीने रजिस्टर माझ्यासमोर जप्त केले

सांगली : पुढारी वृत्तसेवा

सीआयडी अधिकार्‍यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यातील अटक रजिस्टर, लॉकअप रजिस्टर, स्टेशन डायरी यासह रजिस्टर माझ्या समक्ष जप्त केले, अशी साक्ष राहुल अबू मुंढे यांनी अनिकेत कोथळे खून खटल्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयात दिली. पुढील सुनावणी दि. 10 ऑगस्टरोजी होणार आहे.

सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम व त्यांना सहायक म्हणून जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. गिरीष तपकिरे, अ‍ॅड. प्रमोद सुतार, त्यांचे सहायक म्हणून अ‍ॅड. अर्जुन मठपती, अ‍ॅड. विकास पाटील यांनी काम पाहिले.सीआयडीचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी व विद्यमान उपअधीक्षक आयेशा लांडगे सरकार पक्षाला मदत करत आहेत.

अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांच्यासमोर सुरू आहे. मंगळवारी सावंतवाडीचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस. बुधवंत यांची साक्ष झाली होती. महापालिकेमध्ये कनिष्ठ लिपिक पदावर काम करीत असलेले राहुल मुंढे यांची मुख्य साक्ष व उलट तपास पूर्ण झाला. सीआयडीच्या तपास अधिकार्‍यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यातील सहा डायर्‍या, अनिल लाड यांची चारचाकी गाडी व पोलिस ठाण्यातील पडदा राहुल मुंढे यांच्यासमोर जप्त केला होता. या तिन्ही गोष्टींचे पंच म्हणून मुंढे यांनी न्यायालयामध्ये साक्ष दिली. लूटमार केल्याच्या संशयावरून अनिकेत कोथळे खून प्रकरणी तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद आहे. संशयित अरुण टोणेचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला आहे.

तीन साक्षीदार गैरहजर

अनिकेत कोथळे यांचा डीएनए अहवाल देणारे डॉ. आर. एम. शिंदे, शव विचछेदन करणारे डॉ. व्ही. डी. सोनार व अनिकेतचा मृतदेह सावंतवाडी येथून सांगलीला आणणारे हवालदार कृष्णदेव आप्पा कांबळे यांची आज साक्ष होणार होती. परंतु कृष्णदेव कांबळे आजारी असल्याने व अन्य दोन डॉक्टर काही कारणाने आज साक्ष देण्यासाठी न्यायालयात अनुपस्थित होते. पुढील सुनावणीच्यावेळी या तिघांची साक्ष होणार आहे.

Back to top button