दूध खरेदी अनुदान योजना गरजेची! | पुढारी

दूध खरेदी अनुदान योजना गरजेची!

सांगली ; विवेक दाभोळे : राज्यातील तत्कालीन सरकारने सन 2018 मध्ये दूध खरेदीसाठी संघ, संंस्थांना प्रती लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले होते. मात्र, या अनुदानाचा लाभ दुधाच्या ‘कासंडी’त जेमतेमच पडला आहे. आता पुन्हा एकदा खरेदी दर परवडत नसल्याने उत्पादकांतून शासनाने खरेदी अनुदान देण्याची गरज व्यक्त होत आहे.

राज्याच्या अर्थकारणात महत्त्व असलेल्या दुग्ध व्यवसायाचा केंद्रबिंदू असलेला दूध उत्पादक सातत्याने दुधाला किफायतशीर दर मिळावा, यासाठी संघर्ष करतो आहे. सन 2018 मध्ये दूध उत्पादकांतून मोठा प्रक्षोभ झाला. दरवाढीच्या मागणीसाठी उत्पादक रस्त्यावर उतरला. त्यावेळी सरकारने दूध खरेदी दरात वाढ जाहीर केली. तसेच पश्चिम बंगाल सरकार राज्यातील दूध उत्पादकांना खरेदी दरावर प्रतिलिटर दोन रुपये अनुदान देते, त्या धर्तीवर राज्यात दूध संघ, दूध सोसायट्यांना दूध खरेदीसाठी प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली. अगदी अलीकडील वाढीनुसार दुधाला सरासरी 32 रुपये प्रती लिटर दर मिळत आहे. आता पुन्हा एकदा दूध दर वाढवत नाही, तर किमान खरेदी अनुदान देऊन तरी दरवाढ द्या, अशी मागणी दूध उत्पादक करत आहेत.

दूध खरेदी दराबाबतीत उत्पादकांची खुलेआम लूट होत आहे. राज्यशासनाच्या दुग्धविकास विभागाने म्हैस आणि गाय दूध यासाठीचा प्रती लिटर उत्पादन खर्च अनुक्रमे 40 रुपये आणि 28 रुपये (3.50 फॅटसाठी) जाहीर केला आहे. दूध संघचालक, खासगी व्यावसायिक दूध संकलन करताना दूध उत्पादकांकडून 6.5 फॅटचे म्हैस दूध 43.30 रुपये दराप्रमाणे खरेदी करतात. मात्र, हेच दूध प्रक्रिया करून ग्राहकांना प्रतिलिटर 56 ते 57 रुपयांना विकले जाते. गाय दूधदेखील (3.5 फॅटचे) खरेदी होते 27 रुपयांना आणि त्याची ग्राहकांना विक्री होते 46 रुपये प्रती लिटरप्रमाणे!

यातील तफावत तब्बल 28 रुपयांची राहते. दूध संघ, संकलकांना खरेदीनंतर ते ग्राहकाला दूध विक्री करेपर्यंतचा खर्च पुढीलप्रमाणे : संस्था कमिशन – 1.20 रु., संकलन, शीतकरण – 4.80 रु., वाहतूक – 1.80 रु., वितरण, वाहतूक – 4.65 रु. असा प्रती लिटरसाठीचा हा खर्च 12.45 रुपये होता. मात्र, हाच खर्च सातत्याने चर्चेत राहतो आहे. याच दरम्यान, सरकी पेंड, गोळी पेंड, कडबा, ओला चारा यांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. चाळीस किलोचे 900 रु. पेंडीचे पोते आज 1400 रुपयांच्या घरात गेले आहे. त्यातुलनेत दुधाला दर मिळत नाही. याचा विचार होतच नसल्याची टीका होत आहे.

उत्पादन झाले मुलखाचे महाग

बांधलेला गोठा, कडबा कुट्टी यंत्रासाठीची मोठी गुंतवणूक, पशुखाद्याचा खर्च, महागडा हिरवा चारा यातून दूध उत्पादन महागडे बनले आहे. खर्चाच्या मानाने आता दुधाचा दर मिळत नसल्याने उत्पादकाचे आर्थिक गणित बिघडू लागले आहे.

राज्यात दूध उत्पादनाचा टक्का वाढता!

मे 21 मध्ये प्रतिदिन संकलन 1 कोटी 24,95,680 लिटर
मे 22 मध्ये प्रतिदिन 1 कोटी 39 लाख 89,360
सन 1992-93 मध्ये 39 लाख 6 हजार टन गाय दूध, तर 24 लाख 71 हजार 70 टन म्हैस दूध उत्पादन सन 2020-21 मध्ये राज्यात 1 कोटी 37 लाख 3,000 हजार टन उत्पादन (गाय आणि म्हशीचे दूध)

दूध भुकटीचे दर वाढले…

सन 2020 मध्ये दोन वर्षांपूर्वी एक किलो भुकटीचा दर फक्त 140 ते 160 रुपये एवढाच होता. साधारणत: एक किलो भुकटी बनवण्यास 180 ते 200 रुपये खर्च येत असल्याने विक्रीतून उत्पादन खर्चही निघत नव्हता. परिणामी, सर्वच दूध भुकटी प्रकल्पांमधील उत्पादन घटवण्यात आले होते. त्यामुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला. परिणामी दुधाचेही दर 18 ते 20 रुपयांवर आले होते. मात्र, आता भुकटीचा दर 300 ते 325 रुपयांपर्यंत गेल्याने दुधाचा वापर वाढला आहे. परिणामी जादा दुधाचा प्रश्न निकाली निघाला आहे. गायीच्या दुधाला किमान 35 रुपये दर देणे शक्य आहे. याचा विचार करून खरेदी अनुदान योजना सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

Back to top button