बकरी ईद : आटपाडी बाजारात दोन कोटींची उलाढाल | पुढारी

बकरी ईद : आटपाडी बाजारात दोन कोटींची उलाढाल

आटपाडी : पुढारी वृत्तसेवा

येथील शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात बकरी ईदनिमित्त दोन कोटींहून अधिक रकमेची उलाढाल झाली. शनिवारच्या आठवडा बाजारात बकर्‍यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच कोकण आणि कर्नाटकातील व्यापार्‍यांनी मोठी खरेदी केली.

आटपाडी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शनिवारी भरणारा शेळ्या-मेंढ्यांचा बाजार प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि कोकणातील व्यापारी या बाजाराला मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारच्या बाजारात मोठी उलाढाल झाली.

रविवारी होणार्‍या बकरी ईद निमित्त कुर्बानीसाठी लागणार्‍या बोकडांना मोठी मागणी होती. ईद निमित्त मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात बकरी खरेदी करण्यासाठी आले होते. पाच हजारपासून पन्नास हजार रुपयांपर्यंत बोकडांच्या किंमती होत्या. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शशिकांत जाधव म्हणाले, बकरी ईदमुळे आवक वाढली होती. मागील आठवड्यात पाच ते सहा हजार जनावरांची विक्री झाली. सरासरी दोन कोटींची उलाढाल झाली आहे.

Back to top button